मुंबई - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या(बुधवार) दुपारी १ वाजता शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी याबाबत माहिती दिली. राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून १७ लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. कोरोनामुळे या परीक्षेचा निकाल रखडला होता. मात्र, आज मंडळाकडून यासंदर्भातील घोषणा करण्यात आल्याने लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला त्याच दरम्यान ही परीक्षा संपण्याच्या मार्गावर होती. मात्र, तरीही भूगोलाचा पेपर कोरोनामुळे रद्द करावा लागला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या पेपर तपासणी प्रक्रियेवरही मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लागणारा दहावीचा निकाल यावर्षी तब्बल दीड महिन्याहून अधिक उशिराने जाहीर केला जात आहे. पेपर तपासणीवर कोरोनाचा मोठा परिणाम झाल्याने निकाल जाहीर करण्यास उशीर झाला असल्याचे भोसले यांनी सांगितले.