मुंबई : खासदार राहुल गांधी व राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या संसदेतील भाषण वगळण्यात आले आहे. राहूल गांधी यांनी मोदी व अदानी यांच्या संबंधाबद्दल प्रश्न विचारला होता पण मोदी सरकारने मनमानी पदधतीने त्यांचे भाषण कामकाजातून वगळून संसदेतच लोकशाहीचा खून केला आहे. मोदी सरकारमध्ये शेतकरी, तरुण, छोटे व्यापारी, पत्रकार, प्रसार माध्यमांवर अत्याचार केले जात आहेत, त्यांना देशोधडीला लावले जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या हुकूमाशाही कारभाराला देश कंटाळला आहे. त्यामुळे हाथ से हाथ जोडो अभियानाच्या माध्यमातून घरोघरी जावा आणि भाजपा व मोदी सरकारच्या पापाचा पाढा वाचून दाखवा, असे आवाहन पटोले यांनी केले.
काँग्रेस आशेचा किरण :भारत जोडो यात्रेची दखल जगाने घेतलेली आहे, एवढी मोठी पदयात्रा जगाच्या पाठीवार आजपर्यंत झालेली नाही. महाराष्ट्रात ही यात्रा यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने काम केले व त्याचे कौतुक देशभर झाले. भारत जोडो यात्रेने जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचे काम केले. भाजपाचा कारभार पाहता देशात लोकशाही, संविधान राहिल का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पण भारत जोडो यात्रेने जनतेच्या आशा काँग्रेसकडून वाढल्या आहेत, असे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले. तसेच देश, लोकशाही व संविधान वाचवण्याचे काम काँग्रेसच करु शकतो. काँग्रेस पक्षच आता आशेचा किरण बनला असून जनतेचा विश्वास देखील वाढल्याचे थोरात यांनी सांगितले.
कामाला लागा :राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीतील वातावरण पाहता राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला भिती वाटू लागली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळल्या जात आहेत. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकाही एकत्रितच घेतल्या जाण्याची शक्यता आहे. आगामी वर्ष हे महत्वाचे आहे. अमरावती व नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेचा विजय झाला असून ही विजयाची पहिली पायरी आहे. आता आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या कामाला आतापासूनच लागा असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.