मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेचा आजचा शेवटचा दिवस होता. राज्यपालांच्या अभिभाषणावर सत्ताधारी पक्षाकडून अनेक सदस्यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच त्यांनी अभिनंदन ठरावाला समर्थन दिले, तर विरोधी पक्षाकडून सरकारच्या विविध कामातील उनिवा, दोष दाखवत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत अभिनंदन प्रस्तावाला विरोध केला. या सर्व चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेला उत्तर दिले.
राष्ट्रद्रोही म्हणणे योग्य का? मुख्यमंत्री : आपण देशद्रोही शब्दाचा उच्चार केल्याबद्दल सभागृहामध्ये मुद्दा उपस्थित करण्यात आला. मात्र, तत्पूर्वी विरोधकांनी चहापानाला बहिष्कार टाकताना सरकार राष्ट्रदोही असल्याचे म्हटले होते. सरकारला राष्ट्रद्रोही म्हणणे कितपत योग्य आहे. हे आधी अजितदादांनी स्पष्ट करावे. मी एका व्यक्तीच्या संदर्भात देशद्रोही हा उच्चार केला होता. सर्व सदस्यांसाठी नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात दिले.
आम्ही चांगले काम करीत आहोत : राज्य सरकार अतिशय चांगले काम करीत असून विरोधकांना केवळ विरोध करायचा आहे. परंतु विरोधकांचा कितीही विरोध असला तरी, सरकार काम करीत राहणार अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. या सरकारने मुंबई ट्रान्स हार्बर शिवडी ते नावाशेवा हा 22 किलोमीटरचा रस्ता, देशातील सर्वात पहिला असा हा सागरी मार्ग आहे. त्यानंतर सर्वात मोठे भुयार, पुणे मिसिंगलिंग प्रकल्पाच्या निमित्ताने आपण तयार करत आहोत. यामुळे मुंबई पुणे प्रवास अर्धा तासाने वाचणार असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. अडीच वर्ष रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार आहे. मुंबईत मेट्रोचे जाळे उभा करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.
विविध मार्ग प्रगतीपथावर : ठाणे बायपास रस्त्याचे काम अतिशय प्रगतीपथावर आहे. आनंदनगर साकेत मार्गे अहमदाबाद मुख्य हायवेला हा रस्ता जोडला जाणार आहे. भिवंडी हायवेसुद्धा आठ पदरी करण्याचे काम सुरू आहे. रेवस रेड्डी मार्ग, पुणे रिंग रोड मार्ग तसेच मुंबई गोवा कोस्टल हायवे, तसेच नागपूर गोवा ग्रीनफिल्ड हायवे हे मार्ग प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.