मुंबई : मंत्रालयात सोमवारी एकाच दिवशी तीन जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. राज्य सरकारला या घटनेनंतर खडबडून जाग आली आहे. दरम्यान, मंत्री व अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयीन वेळा सर्वसामान्य जनतेच्या भेटीसाठी राखून ठेवाव्यात. तशा पाट्या दालनाबाहेर लिहाव्यात, असे आदेश मुख्य सचिवांनी दिले आहेत.
सर्वसामान्यांसाठी वेळ राखीव ठेवा :राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक आपल्या कामाची दाद मागण्यासाठी मंत्रालय गाठतात. अनेकदा सतत खेटे मारावे लागतात. लांबून आल्यानंतर देखील मंत्री व अधिकाऱ्यांकडून वेळ मिळत नाही. परिणामी नैराश्य आल्याने काहीजण टोकाचे पाऊल उचलतात. सोमवारी एकाच दिवशी तीन जणांनी मंत्रालय आणि परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला. धुळे येथील एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. राज्य सरकार या घटनानंतर खडबडून जागे झाले. दरम्यान, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी नव्याने परिपत्रक काढून सर्वसामान्य जनतेला भेटण्यासाठी वेळेचे नियोजन करावे, असे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा पदभार असून त्यांच्या आदेशानुसार हे परिपत्रक काढण्यात आले आहे.