मुंबई :भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील वर्धमान कंपाउंड मधील तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी घडली. घटनास्थळी दुसऱ्या दिवशीही मदतकार्य सुरूच असून या दुर्घटनेत आतापर्यत 6 जणांचा मृत्यू झाला असून 10 जखमींवर भिवंडीतील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इमारतीच्या ढिगार्याखाली आणखी काही जण अडकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नवनाथ सावंत (वय,४०) लक्ष्मीदेवी रवी म्हातो (वय,२६ ) श्रीमती, सोना मुकेश कोरी (वय,४५ ) सुधाकर गवई ( वय,३४ ) प्रवीण (प्रमोद) चौधरी (वय , २२) असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्याची नावे आहेत.
ईमारतीवर मोबाईल टॉवर :दुर्घटना ग्रस्त इमारतीत तळ मजला, पहिल्या मजल्यावर एका कंपनीचे गोडाऊन होते, तर दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर रहिवासी खोल्या बनविण्यात आल्या होत्या. ज्यात भाडेतत्वावर नागरिक राहत होते. काल दुपारी घटनेची माहिती मिळताच सुरुवातीला घटनास्थळी अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पोलीस यंत्रणा दाखल होत बचाव कार्य सुरू केले. त्यांनतर ठाणे येथील टीडीआरएफ, एनडीआरएफ पथक दाखल होत बचाव कार्य सुरू करण्यात आले होते. इमारती वरील दोन मजले हे रहिवासी वापरासाठी होते. ज्यात २७ ते ३० खोल्या बनविण्यात आल्या होत्या. धक्कादायक म्हणजे या कमकुवत इमारतीवर मोबाईल टॉवर उभारण्यात आला होता. ज्यामुळे इमारतीवर अतिरिक्त भार पडला होता. इमारतीच्या बांधकामात सुरक्षेची कोणतीही बाब बांधकाम विकासकाने लक्षात घेतलेली नसल्याने हि इमारत कोसळली आहे.
५ कामगारांना जीवदान : वळ ग्रामपंचायत हद्दीतील वळपाडा येथील वर्धमान ही तळ अधिक तीन मजली इमारत होती. ही इमारत २०१४ मध्ये इंद्रपाला गुरुनाथ पाटील यांनी उभारली होती. या इमारतीच्या तळमजल्यावर एम.आर. के फुड्स या कंम्पनिचे चायनीज फूड प्रोडक्ट सप्लाय करणारे गोदाम असून पहिल्या मजल्यावर साठवणुकीचे गोदाम आहे. एम आर के फुडस कंपनीमध्ये सुमारे ५५ कामगार होते. जेवणाची वेळ असल्याने अनेक कामगार गोदामा बाहेर होते. तर ५ कामगार जिवाच्या भीतीने गोदामाच्या दारात उभ्या असलेल्या कंटेनरमध्ये पाळल्याने त्यांना जीवदान मिळाल्याची माहिती तेथील कामगार अनिल तायडे यांनी दिली.