पुणे - महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्ष असलेल्या पक्षांना विचारात घेतले नसल्याची चर्चा सर्वत्र आहे. छोट्या मित्र पक्षांना कार्यक्रमाचे आमंत्रणही देण्यात न आल्याने त्यांच्यात नारजी पाहायला मिळाली. आमंत्रण नसतानाही रिपब्लिकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे शपथविधीला उपस्थित होते. यावेळी, 'येणाऱ्या काळात घटक पक्षांना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल', अशी आशा कवाडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
शपथविधीनंतर बोलताना कवाडे म्हणाले, "आज ज्या मंत्र्यांनी शपथ घेतली त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. पण त्यासोबतच, येणाऱ्या काळात मित्रपक्ष असलेल्या घटक पक्षांकडे महाविकास आघाडीतर्फे चांगले मंत्रीपद देण्यात येईल, अशी अपेक्षा करतो. आम्ही आमंत्रण नसतानादेखील केवळ आमचे सरकार स्थापन झाले, असे समजून या शपथविधी कार्यक्रमासाठी आलो आहोत. आम्हाला महाविकास आघाडी सन्मानजनक वागणूक देईल, अशी आशा आहे"