महाबीज सोयाबीन बियाणे बदलून द्या, कृषीमंत्र्यांचे आदेश - महाबीज बियाणे बदलून द्या
सरकारी कंपनी महाबीजबद्दल देखील शेतकर्यांच्या तक्रारी आहेत. ज्या ठिकाणी महाबीजचे बियाणे उगवले नाही, त्या शेतकर्यांना तातडीने महाबीजचे बियाणे बदलून द्यावेत, असे आदेशही कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.
मुंबई - सोयाबीनचे पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकर्यांनी केल्या आहेत. त्याची तातडीने दखल घेत तक्रारीची पडताळणी करण्यासाठी तपासणी पथकाची संख्या वाढवावी, असे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी विभागाला दिले. याप्रकरणी संबंधित दोषी कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची सूचना कृषिमंत्री भुसे यांनी दिल्या आहेत. दरम्यान, सरकारी कंपनी महाबीजबद्दल देखील शेतकर्यांच्या तक्रारी आहेत. ज्या ठिकाणी महाबीजचे बियाणे उगवले नाही, त्या शेतकर्यांना तातडीने महाबीजचे बियाणे बदलून द्यावेत, असे आदेशही कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.
सोयाबीन बियाण्यांची उगवण झाली नाही. याच्या अभ्यासासाठी परभणी कृषी विद्यापीठातील सोयाबीनचे शास्त्रज्ञ आणि कृषी विभागातील अधिकार्यांची समिती नेमण्यात आल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील शेतकर्यांना बियाणे-खते उपलब्ध व्हावेत यासाठी कृषिमंत्र्यांनी बीड, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यांचा दौरा करत असताना शेतकर्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी कृषिमंत्र्यांकडे केल्या होत्या. कृषिमंत्र्यांनी काही शेतकर्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन पाहणीही केली.