मुंबई - पंजाब आणि महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घातलेल्या बंधनातून खातेदारांना लवकर दिलासा मिळावा, तसेच बँकेचे दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू व्हावेत, यासाठी आमदार रवींद्र वायकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट दाखल केली आहे. याप्रकरणी, न्यायालयाने मध्यस्थी करुन खातेदारांना दिलासा द्यावा, अशी विनंती त्यांनी रिट याचिकेद्वारे केली आहे.
पीएमसी बँकेतील घोटाळा उघडकीस आल्याने आरबीआयने संचालक मंडळ बरखास्त केले असून प्रशासकाची नियुक्ती केली आहे. एवढेच नव्हे तर खातेदारकांना स्वत:च्या खात्यातील पैसे काढण्यासाठीही काही बंधने घातली. त्यामुळे खातेदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यातून खातेदारांना तत्काळ दिलासा मिळावा यासाठी जोगेश्वरीतील अनेक खातेदारांनी आमदार रविंद्र वायकर यांची भेट घेतली.