मुंबई :उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानपरिषदेत अतिशय आक्रमक भूमिका घेतली. परिषदेच्या सभागृहात गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात यावा, अशी मागणी करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला आहे. नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवण्यात यावे आणि सभागृहात निर्माण झालेला घटनात्मक पेच ताबडतोब सोडवावा या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने 40 आमदार या बैठकीसाठी उपस्थित होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी ज्येष्ठ नेते या शिष्टमंडळात सहभागी होते.
समिती नेमा-दानवे :यावेळी बोलताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवण्यात यावे अशी मागणी केली. तसेच यासाठी राज्याचे अधिवाक्ता जनरल यांच्याशी चर्चा करावी आणि हा घटनात्मक पेच लवकरात लवकर सोडवावा, अशी मागणी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे. तर जोपर्यंत हा पेच सुटत नाही तोपर्यंत एक समिती नेमण्यात यावी आणि या समितीमार्फत कामकाज चालवावे, अशी मागणीही यावेळी अंबादास दानवे यांनी केली.
नीलम गोऱ्हेंचा या कारणाने शिवसेनेत प्रवेश : उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांची त्यांच्या पक्षात घुसमट होत होता. त्यामुळे त्या नाराज असल्याने त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. नीलम गोऱ्हे यांच्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
नीलम गोऱ्हे उद्धव ठाकरे गटात नाराजी : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या शिंदे गटात जाण्याच्या चर्चा गेल्या वर्षभरापूर्वीच सुरू झाल्या होत्या. शिंदे फडणवीस सरकारचे पहिले विधिमंडळ अधिवेशन काळातच सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरून लक्ष्य केले होते. त्यावेळी अनेक ठाकरे गटाच्या आमदारांनी नीलम गोऱ्हे आपल्याला सभागृहात बोलू देत नाहीत, अशा प्रकारची तक्रार उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी गोऱ्हे यांना खडे बोल सुनावल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर नीलम गोऱ्हे नाराज असल्याची देखील चर्चा सुरू झाली होती. उपसभापती असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक कार्यक्रमात नीलम गोऱ्हे दिसत होत्या.
हेही वाचा:
- NCP Political Crisis: राष्ट्रवादीत हाय होल्टेज ड्रामा; अजित पवारांसह आमदार दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला
- Opposition Parties Meeting in Bengaluru : सोनिया गांधींसह राहुल गांधी विरोधी पक्षाच्या बैठकीसाठी बंगळुरुला रवाना, महाबैठकीत 24 पक्ष होणार सहभागी
- Maharashtra Assembly 2023 Update : नीलम गोऱ्हे यांना खुर्चीवर बसण्याचा नैतिक व कायदेशीर अधिकार नाही- अनिल परब