मुंबई Sameer Wankhede:एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांना 10 जानेवारीपर्यंत अटक न करण्याचे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. समीर वानखेडे यांच्यावर कार्डेलिया ड्रग्स क्रूज पार्टी प्रकरणात लाच घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळं समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती पी. डी. नाईक, न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी समीर वानखेडे यांच्यावर 10 जानेवारीपर्यंत कोणतीही सक्तीची कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
समीर वानखेडेंवर लाच घेतल्याचा आरोप :एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. त्यावेळी अभिनेता शाहरुख खान यांच्या मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. यानंतर आर्यन 27 दिवस आर्थर रोड जेलमध्ये होता. आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडे यांनी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळं वानखेडे यांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या संदर्भात आज खंडपीठासमोर सुनावणी झाली असता, समीर वानखेडे यांना 10 जानेवारीपर्यंत दिलासा मिळाला आहे.
गुन्हा रद्द करावा :नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग हे कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात वानखेडे यांची चौकशी करणाऱ्या पथकाचा भाग असू शकत नाहीत; असा दावा समीर वानखेडे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. 13 ऑक्टोबर 2023 रोजी कॅटनं समीर वानखेडे यांना दिलासा देणारा निर्णय दिला होता. त्यावेळी कॅटनं एनसीबीचं म्हणणं फेटाळून लावलं होतं. त्यामुळेच समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात बेकायदेशीर खटला रद्द करण्याची मागणी केली आहे.