मुंबई :उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला राज्य सरकारने मोठा दणका दिला आहे. राज्यातील महत्त्वाच्या पाच विमानतळांचे संचालन करण्याचे काम या कंपनीकडे देण्यात आले होते. मात्र, यात कंपनीला अपयश आल्याने राज्य सरकारने संचालन काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता या पाच विमानतळांचे नियंत्रण पुन्हा एकदा राज्य सरकारच्या महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाकडे देण्यात येणार आहे, असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
काय आहेत कारणे? :राज्यातील लातूर, नांदेड, यवतमाळ, बारामती, धाराशिव या पाच विमानतळांवरील संचालनाचे काम अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले होते. मात्र, या ठिकाणी विमानतळे सुरू करण्यास या कंपनीला अपयश आले आहे. तसेच नांदेड येथे रात्री विमान उतरण्याची सोय रिलायन्स कंपनी करू शकली नाही. त्यामुळे या पाचही विमानतळांवरील सर्व अधिकार पुन्हा काढून घेण्यात येणार असून या विमानतळांचे संचालन राज्य सरकारच्या महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीकडे देण्यात येणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची नाराजी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नांदेड येथे शासकीय दौरा असताना त्यांच्यासमोर अनेक अडचणी निदर्शनास आल्या. याबाबत त्यांनी माहिती घेतली असता रिलायन्सला अनेकदा सांगूनही रिलायन्सने शुल्क भरले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच या विमानतळांची दुरुस्ती, देखभाल याकडेही रिलायन्स कंपनीने दुर्लक्ष केले असून अनेक अडचणी असल्याची माहिती राज्य सरकारकडून शहा यांना देण्यात आली. यवतमाळ, लातूर, धाराशिव या विमानतळाचे काम सुमारे 14 वर्षांपासून रखडले आहे. 2015 मध्ये राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यवतमाळ विमानतळाचे काम काढून घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्या संदर्भातही पुढे कार्यवाही झाली नाही, अशी माहिती ही सामंत यांनी दिली.