मुंबई - शहरात कोरोनाचा कहर वाढत असून हजारो रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. मात्र, आयसीयूमधील रुग्णांची माहिती नातेवाईकांना मिळत नव्हती. ही माहिती त्यांच्या नातेवाईकांना रोज दिली जावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका व आरोग्य समितीच्या सदस्या डॉ. सईदा खान यांनी आरोग्य विभागाचे उपायुक्त रमेश पोवार यांच्याकडे केली होती. ही मागणी पालिकेने मान्य केल्याने आयसीयूमधील रुग्णांची माहिती नातेवाईकांना मिळणार आहे.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 30 हजार 542 वर पोहोचली आहे. त्यापैकी 988 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 7400 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यावर त्याला कोरोना केअर सेंटरमध्ये किंवा रुग्णालयात दाखल केले जाते. रुग्णाची परिस्थिती गंभीर असल्यास त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार केले जातात. कोरोना केअर सेंटरमधील रुग्णांकडे मोबाईल असल्याने त्यांची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळत असते.
रुग्णालयात आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णांसोबत कोणालाही राहायची परवानगी नसते. कधी कधी तर रुग्ण हॉस्पिटलमध्ये असताना त्याचे कुटुंबीय क्वारंटाइन असतात. अशावेळी आयसीयूमधील रुग्णाची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळत नाही. रुग्ण बरा झाला किंवा त्याचा मृत्यू झाला तरच त्याची माहिती रुग्णालयातून दिली जाते. कधी कधी तर रुग्णाचा मृत्यू झाल्याची चुकीची माहिती इतरांकडून दिली जात असल्याने नातेवाईकांची पळापळ होते.