मुंबई :महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या हजारो कामगारांच्या आंदोलनाची दखल घेत अखेर राज्य सरकारने कामगारांचे वेतन नियमित करण्यासाठी तजवीज केली आहे. त्यानुसार कामगारांना आता दरमहा त्यांचा पगार नियमित आणि वेळेत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे याबद्दल राज्य शासनाचे एसटी कर्मचाऱ्यांनी आभार व्यक्त केले असले तरी मूळ दुःख मात्र कायम आहे. एसटी महामंडळ गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात आहे एसटी महामंडळाचा संचित तोटा साडेबारा हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.
एसटीकडे डिझेलसाठी पैसे नाहीत :शेकडो गाड्या दुरुस्तीविना आगारात पडून आहेत. एसटीकडे डिझेल आणि देखभाल दुरुस्तीसाठी पैसे नाहीत म्हणून अनेक गाड्या मार्गावर धावत नाहीत, असे चित्र असताना एसटी महामंडळ टिकले पाहिजे, लाल परी गावागावात धावली पाहिजे. यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. जोपर्यंत एसटी महामंडळ स्वयंपूर्ण आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत एसटी कामगार स्वस्थ होणार नाही. एसटी महामंडळ टिकले तरच कामगार टिकणार आहेत. प्रवाशांना माफक दरात प्रवास करता येणार आहे. त्यामुळे आजारी असलेल्या लाल परीला सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने तजवीज केली पाहिजे. एसटी महामंडळाचे विधीनीकरण शासनात शक्य नसेल तर, एसटीला अधिक मजबूत तरी करायला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे.
एसटी महामंडळाच्या गाड्यांची स्थिती? :एसटी महामंडळाकडे जुन्या गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातील शेकडो गाड्या थेट भंगारात काढण्या योग्य आहेत. सद्यस्थितीला एसटी महामंडळाकडे सुमारे पंधरा हजार गाड्या आहेत. यापैकी दहा हजारापेक्षा अधिक गाड्या या दहा लाख किलोमीटर पेक्षा अधिक अंतर धावलेल्या आहेत. त्यामुळे यातल्या हजारो गाड्या थेट निकामी होण्याची शक्यता असल्याने लाल परी यापुढे रस्त्यावर दिसेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. महामंडळाकडे सध्या असलेल्या 15 हजार 600 गाड्यांपैकी प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या गाड्यांची संख्या पावणे तेरा हजारांच्या आसपास आहे.