मुंबई - कोरोनाच्या मृतांची आकडेवारी लपवल्याचा आरोप करण्यात येत असल्याने मुंबई महापालिकेने सर्व रुग्णालयांना 48 तासांची नोटीस बजावली आहे. यावेळेत कोरोनाच्या मृत्यूची नोंद राहिली असल्यास तसे पालिकेकडे स्पष्ट करावे. अन्यथा, अशी नोंद न केल्यास त्या रुग्णालयावर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिला आहे.
मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रुग्ण आणि मृतांची आकडेवारी महापालिकेकडून लपवली जात असल्याची चर्चा होती. त्यात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महापालिकेने मृतांची आकडेवारी लपवल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर राज्य सरकारने सर्व पालिका आणि जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवून आपल्या हद्दीतील मृतांची नोंद करण्याचे राहिले असल्यास त्याची नोंद करावी, असे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेने ८६२ मृतांची नोंद केली आहे. पालिकेने आकडेवारी लपवलेली नाही, प्रलंबित असलेल्या रिपोर्टच्या नोंदी पालिकेकडे उशिराने आल्या, असे स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिकेने दिले आहे.