मुंबई:राज्य शासनाच्या विविध 43 खात्यांतर्गत हजारो पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत. या रिक्त पदांवर भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता देशाच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येत्या 15 ऑगस्ट पूर्वी ही भरती करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यासाठी एक जून पासून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सुमारे अडीच महिन्यात 75 हजार जागांची भरती करण्याचा शासनाचा मानस असल्याचे सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
भरती प्रक्रियेसाठी कंपन्यांची नियुक्ती: भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आता राज्य सरकारच्या वतीने जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तसेच स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सद्यस्थिती आणि बेरोजगारी डोळ्यासमोर ठेवून हा मेगा भरतीचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरू आहे. सध्या या भरती प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण नाही. त्यामुळे लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी कालबद्ध पद्धतीने 15 ऑगस्ट पूर्वी ही भरती करण्यात येणार असून तसा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यापूर्वीच घेण्यात आलेला आहे. त्यानुसार लोकसेवा आयोगाच्या कक्ष बाहेरील गट ब क आणि गट ड पद भरतीसाठी आता टीसीएस आणि आयबीपीएस या खाजगी कंपन्यांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विभागातील रिक्त जागाआणि भरती :महसूल, कृषी, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा, सामाजिक न्याय, ग्रामविकास, गृह आणि गृहनिर्माण, पशुसंवर्धन, सार्वजनिक आरोग्य, महिला आणि बालकल्याण या विभागात भरती होणार आहे. तसेच जिल्हा परिषदा एकूण 18 हजार 931 जागा रिक्त आहे. शिक्षण विभाग 67 हजार पदे रिक्त तर महिला बालकल्याण अंगणवाडी सेविका मदतनीस वीस हजार पदे रिक्त आहेत. तसेच तलाठीच्या 3628 जागा रिक्त आहे. वनविभागात 9640 जागा रिक्त आहेत. ग्रामविकास विभागात, ग्रामसेवकाचे दहा हजार पदे रिक्त आहेत.