मुंबई - शहरातील धोकादाक ठरलेल्या 29 पुलांपैकी पश्चिम उपनगरातील 7 पुलांचे ऑक्टोबरपासून नव्याने बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका 95 कोटी 42 लाख 22 हजार 887 रुपये खर्च करणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून स्थायी समितीत देण्यात आली आहे.
हेही वाचा -दुरुस्तीचे काम..! दोन दिवस अंधेरी, वांद्रे, धारावीत पाणीपुरवठा बंद
मुंबई महानगरपालिका हद्दीतील महापालिकेच्या अखत्यारीतील शहर विभाग, पश्चिम उपनगरे व पूर्व उपनगरे येथील 6 मीटरपेक्षा जास्त लांबी असलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट (संरचनात्मक सर्वेक्षण) करण्यात आले होते. त्यावेळी 14 पूल धोकादायक स्थितीत आढळले होते. मात्र, 14 मार्च 2019 रोजी झालेल्या हिमालय पूल दुर्घटनेत 7 जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील सर्वच पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. स्ट्रक्चरल ऑडिटर देसाईच्या ‘बोगस’ ऑडिट रिपोर्टमुळेच हिमालय पूल दुर्घटना घडल्याचे समोर आल्यानंतर तत्कालीन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबईतील सर्वच पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले होते.