मुंबई - तब्बल चार हजार कोटी रुपयांचा घोटाळा असलेल्या पीएमसी बँकेच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाकडून कुठलाही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे पीएमसी बँक खातेधारकांना आज (सोमवारी) पुन्हा एकदा येथील आझाद मैदानावर आंदोलन केले. आंदोलनादरम्यान पीएमसी बँकेच्या झालेल्या घोटाळ्यात आरबीआय सुद्धा शामिल असल्याचा आरोप पीएमसी बँक ग्राहकांनी केलेला आहे.
पीएमसी ग्राहकांकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये न्यायालयाने आरबीआयला पीएमसी बँक खातेधारकांना त्यांचे पैसे देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आलेली होती. मात्र, न्यायालय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला अशा प्रकारचे कुठलेही आदेश देऊ शकत नाही. आरबीआयने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास याचिकाकर्त्यांनी करावा, असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सांगितले होते. यानंतर न्यायालयात झालेल्या सुनावणीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुळे पीएमसी बँकेच्या खातेदारकांचा पैसा हा वाचला आहे. बँकेत घोटाळा झाल्यानंतर योग्य पावले उचलणे गरजेचे होते आणि ती आरबीआयने उचलल्याचेही म्हटले आहे .