मुंबई :शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांनी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटी रूपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. सोमय्यास्वत:च्या फायद्यासाठी अलिबाग येथील कोर्लई तसेच महाकाली गुंफा जमीन प्रकरणी सातत्याने बिनबुडाचे आरोप करत आहेत. यातून ते माझी, माझ्या कुटुंबाची तसेच पक्षाची नाहक बदनामी करत आहेत. ते जनमानसातील लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करत आहेत. यामुळे मला मानसिक त्रास होत आहे, असे तक्रारीत वायकरांनी म्हटले आहे.
तथ्यहीन आरोपांमुळे सोमय्या तोंडघशी पडले
अलिबाग कोर्लई येथील जमीन संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडून संयुक्तरित्या खरेदी केली आहे. त्या जमिनीवर १९ बंगले असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात लपविण्यात आली, असा दावा सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध समाजमाध्यमांद्वारे केला होता. शिवाय, या जमिनीवरील बंगल्याचा वापर व्यवसायासाठी केल्याचा, तसेच या दोघांमधील आर्थिक हितसंबंध काय आहेत? असा आरोपही सोमय्या यांनी केला होता. परंतु, त्यांच्या या सर्व निराधार आरोपांत काहीच तथ्य नाही. हे विविध प्रसामाध्यमांनीच पुढे उघडकीस आणले आहे. त्यामुळे सोमय्या या प्रकरणी तोंडघशी पडले आहेत, असे वायकरांनी म्हटले आहे.
सोमय्यांनी माफी मागावी, अन्यथा...
महाकाली गुंफा येथील जमीन प्रकरणी वायकरांना अविनाश भोसले व शाहिद बलवा यांच्याकडून २५ कोटी रुपयांचा मोबदला मिळाल्याचा आरोपही सोमय्यांनी केला. हे आरोप करतानाही त्यांनी कुठलेही सबळ पुरावे सादर केले नाहीत. किरीट सोमय्या हे सातत्याने स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी आपली, आपल्या कुटुंबाची तसेच पक्षाची प्रतिमा मलिन करुन मानसिक त्रास देत आहेत. त्यामुळे सोमय्यांनी या दोन्ही प्रकरणी जाहीर माफी मागावी. अन्यथा सिव्हील व क्रिमिनल कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही वायकरांनी सोमय्या यांना नोटीसीद्वारे दिला होता. एवढेच नव्हे तर, या दोन्ही प्रकरणी वायकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त तसेच एम.आय.डी.सी पोलिस ठाण्यास पत्र देऊन बेताल व बिनबुडाचे वक्तव्य करुन जनमानसातील लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलिन करणार्या किरीट सोमय्या यांना लगाम घालण्याची उचित कारवाई करण्याची विनंतीही या अगोदर केली आहे.
किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार ?
वायकर यांनी किरीट सोमय्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रूपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. एवढेच नव्हे तर लवकरच या प्रकरणी ते कायदेशीर कारवाईसाठी दावाही दाखल करणार आहेत. याची माहीती स्वतः वायकरांनी दिली आहे. यामुळे किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा -...म्हणून कोरोनाबाधित रुग्ण दुचाकी चालवत पोहचला दुसऱ्या आरोग्य केंद्रावर
हेही वाचा -पुण्यात सात दिवसांची संचारबंदी जाहीर; जाणून घ्या काय बंद, काय सुरू