मुंबई : राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना अधिकारी मदत द्यावी तसेच धान खरेदी केंद्र वाढवावीत या मागणीसाठी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विदर्भातील आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता. धान खरेदी केंद्र विदर्भात अजूनही काही ठिकाणी सुरू नाही ती सुरू व्हावेत अशी मागणी करण्यात आली या प्रश्नाला उत्तर देताना रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना आता जास्तीत जास्त धान खरेदी केंद्र उपलब्ध करून देता येतील. शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15000 रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा अन्नपुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत केली.
प्रतिहेक्टरी पंधरा हजार रुपये : राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून प्रतिक्विंटल बोनस देण्यात येत होता मात्र हा बोनस देताना अनेकदा त्याचा लाभ बोगस शेतकरी घेताना दिसत होते त्यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत होते. त्यामुळे आता सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल बोनस न देण्याचा निर्णय घेतला आहे. या ऐवजी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 15000 रुपये बोनस देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने सुमारे एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी सभागृहात दिली. दरम्यान 2021-- 22 या दोन वर्षांमध्ये सरकारने कुठल्याही पद्धतीच्या बोनस धान उत्पादक शेतकऱ्यांना दिला नव्हता. मात्र आता या सरकारने शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल, अशी घोषणा केली.