मुंबई : राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये राज्यात एक हजारापेक्षा अधिक आत्महत्या झाल्याची धक्कादायक माहिती अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतीच दिली. या आकडेवारीमुळे पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झाला असून आत्महत्या वाढल्याचे समोर आले आहे.
शेतकीर आत्महत्येची आकडेवारी? : राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा गेल्या काही वर्षांपासून कळीचा मुद्दा ठरतो आहे. 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या कालावधीत राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युतीचे सरकार होते. या काळात 5061 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. 2019 ते 2021 या अडीच वर्षांच्या काळात राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार होते. या अडीच वर्षाच्या काळात 1660 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा दर काहीसा खाली आल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा दर आता पुन्हा एकदा वाढला असून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या सात महिन्यांमध्ये 1023 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे गेल्या आठ वर्षांमध्ये आतापर्यंत सुमारे साडेसहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे कारण : शेतकऱ्यांबाबत राज्य सरकारचे असलेले उदासीन धोरण, नापिकी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षात अडचणीत आणले आहे. त्यातच शेतमालाला रास्त भाव मिळत नाही. खतांच्या वाढलेल्या किमती, बोगस बियाण्यांचा प्रश्न, तसंच शेतकऱ्यांचं बँकेतील घसरलेली पत, सावकारी कर्जाचा वाढलेला पाश या सगळ्या दृष्टचक्रामुळे शेतकरी अडचणीत आला असून त्याने आत्महत्या करण्याचा मार्ग स्वीकारला असल्याचा दावा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.