मुंबई : मागच्यावर्षी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर जबरदस्तीने हनुमान चालीसा म्हणणारच असा शड्डू ठोकल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मात्र 'या गुन्ह्यातून त्यांना दोषमुक्त करावे' असा अर्ज त्यांनी केलेला आहे. आज या संदर्भात दोष मुक्ततेबाबत न्यायालयात सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने खासदार नवनीत राणा सोबत नसल्याने आमदार आणि पती रवी राणा यांना सवाल केला. त्यावर रवी राणा यांनी खासदार लोक सेवक असल्याने त्यांना अत्यावश्यक कामासाठी गैरहजर राहण्याची सूट मिळावी, असा अर्ज सादर केल्याचे सांगितले. न्यायालयाने तो अर्ज मान्य करत सुनावणी 14 जुलै रोजी नक्की केली जाईल असे म्हटले.
थोडक्यात टळली अटक : हनुमान चालिसा प्रकरणात राणा दाम्पत्यापैकी रवी राणाची न्यायालयात हजेरी होती. अगदी वेळेत ते हजर झाले. अटक वॉरंट टाळण्यासाठी त्यांनी ही हजेरी लावली होती. दरम्यान सुनावणी सुरू होताच न्यायाधीशांनी त्यांना खासदार नवनीत राणाविषयी प्रश्न केला. नवनीत राणा कुठे आहेत? त्यावर पती रवी राणा यांनी उत्तर दिले. त्या लोकसेवक आहेत. जनतेच्या अत्यावश्यक कामासाठी त्या गैरहजर आहेत. त्यांना त्याबाबत सूट मिळावी, असा विनंती अर्ज दाखल केला असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने तुमच्यावरील आरोपांना दोषमुक्तता मिळण्यासाठी तुमचे अर्ज आहेत, तेव्हा दोन्ही व्यक्ती हजर राहणे जरुरी असल्याचे म्हणत पुढील सुनावणी 14 जुलै रोजी निश्चित केली आहे. परिणामी आज रवी राणा हजर झाल्याने न्यायालयाने त्यांच्या हजेरीची नोंद घेतली. त्यामुळे त्यांची आजची अटक टळली.
आधी पती गैरहजर आता पत्नी :मागील 15 दिवसांपूर्वी सुनावणीस पत्नी नवनीत राणा हजर होत्या. आता पत्नी गैरहजर होती. दरम्यान उशिरा आल्यामुळे नवनीत राणा यांना न्यायालयाने अक्षरशः सुनावले. 'ही काय कोर्टात यायची वेळ आहे का?' असे म्हणत "पुढच्या वेळेला वेळेत हजर व्हा " असे म्हणत न्यायालयाने त्यांना खडसावले. तसेच दुसरे आरोपी रवी राणा नाहीत का? असा प्रश्न देखील न्यायालयाने केला होता. याची जाणीव ठेवत आज मात्र वेळेत आमदार रवी राणा हजर राहिले.