मुंबई - महापालिकेच्या जोगेश्वरी येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये डोळ्यांची शस्त्रक्रिया करताना अंधत्व आलेल्या रुग्णांना २० लाख रुपये आर्थिक मदत द्यावी. तसेच त्यांच्या कुटुंबातील एकाला पालिकेत नोकरी द्यावी, अशी मागणी सभागृह विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली. रवी राजा यांनी पालिका सभागृहात या प्रकरणी निवेदन सादर केले होते. त्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा देत आरोग्य विभागाचे वाभाडे काढले. याबाबत पुढील बैठकीत आयुक्तांनी कारवाईचा अहवाल सादर करावा, अशा सूचनाही महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
'त्या' कुटूंबीयांना प्रत्येकी २० लाख रुपये व पालिकेची नोकरी द्या - रवी राजा - महापालिका
जोगेश्वरी येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये डोळ्यांची शस्त्रक्रिया करताना अंधत्व आलेल्या रुग्णांना २० लाख रुपये आर्थिक मदत द्यावी. तसेच त्यांच्या कुटुंबातील एकाला पालिकेत नोकरी द्यावी, अशी मागणी सभागृह विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली.
बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटरमध्ये ४ जानेवारीला डोळ्यावर शस्त्रक्रिया करताना जंतुसंसर्गामुळे ७ जणांना अंधत्व आले होते. त्यापैकी ३ जणांना कायमची दृष्टी गमवावी लागली. या धक्कादायक प्रकारानंतर २५ जानेवारीला नगरसेवक अभिजित सामंत यांनी स्थायी समितीत याची माहिती देताच आयुक्तांनी ७ दिवसात अहवाल देण्याचे कबूल केले होते. मात्र, आजतागायत अहवाल आला नाही. त्यामुळे विरोधी पक्षेनेते रवी राजा यांनी सोमवारी सभागृहात निवेदन दिले. या निवेदनात या प्रकरणी चौकशी समितीचा अहवालही अद्याप आलेला नाही. या घडलेल्या प्रकाराला महानगरपालिका प्रशासनाचा बेजबाबदारपणाचे कारणीभूत आहे. यामुळे महापालिकेने पीडितांना प्रत्येकी २० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली.
नगरसेवक अभिजित सामंत यांनी विविध दाखले देत आरोग्य खात्याची पारदर्शकता लोप पावत चालल्याचे सांगत आरोग्य खात्याला भ्रष्टाचाराचा संसर्ग झाल्याचा आरोप केला. स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी तर या प्रकरणी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आणि परिचारिका यांना सोडून सुपरिटेंडंटवरच कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. तसेच त्यांनी चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार होत असल्याचाही आरोप केला. दरम्यान, चौकशी समितीने सर्वांगाने चौकशी करून येत्या सभागृहात कारवाईचा अहवाल सादर करावा व दोषींवर कारवाई करावी, अशा सूचना महापौर महाडेश्वर यांनी दिल्या आहेत.