महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'''बीएमसी''चे नाव भ्रष्टाचारी महानगरपालिका करा'

मुंबईत रस्ते, भूखंड, डेब्रिज, नालेसफाई आदी अनेक घोटाळे उघडकीस आले आहेत. याप्रकरणी अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. आता पुन्हा एकदा पालिकेचे अधिकारी गैरव्यवहार करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ravi-raja-comment-on-mumbai-bmc-in-mumbai
ravi-raja-comment-on-mumbai-bmc-in-mumbai

By

Published : Jan 18, 2020, 9:47 PM IST

मुंबई - महापालिकेत काम करणाऱ्या एका माजी अधिकाऱ्याच्या घरावर 'ईडी'ने छापा मारला आहे. त्यात त्याच्याकडे दुबई येथे संपत्ती असल्याचे उघड झाले आहे. एका माजी अधिकाऱ्याकडे इतके पैसे आले कुठून याची चौकशी केली जात आहे. घोटाळे झाल्यावर संबंधित अधिकाऱ्यांवर पगारवाढ थांबवण्याची कारवाई केली जाते. मात्र, असे न करता अशा अधिकाऱ्यांची पगारवाढ थांबवून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करायला हवी, असे मत विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे. बीएमसीचे नाव भ्रष्टाचारी महानगरपालिका असे करावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

'बीएमसी'चे नाव भ्रष्टाचारी महानगरपालिका करा

हेही वाचा-राजाला पुरावा मागितलाच तर त्यांनी तो द्यावा - लक्ष्मण माने

मुंबईत रस्ते, भूखंड, डेब्रिज, नालेसफाई आदी अनेक घोटाळे उघडकीस आले आहेत. याप्रकरणी अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. आता पुन्हा एकदा पालिकेचे अधिकारी गैरव्यवहार करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचलनालयाने पालिकेच्या माजी मुख्य अभियंत्याच्या घरावर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी छापा टाकला आहे. या कारवाईत आरोपी अधिकाऱ्याने अशाच संशयास्पद व्यवहारातून दुबईत घेतलेल्या घराचेही कागदपत्रे सापडली आहेत. संबंधित आरोपी अभियंता मुंबई महानगरपालिकेच्या इमारत प्रस्ताव आणि विकास आराखडा याच्याशी संबंधित महत्त्वाच्या विभागात कार्यरत होता.

ईडीने कारवाई केलेल्या अधिकाऱ्याचे नाव उघड केलेले नाही. मात्र, संबंधित अधिकारी सात वर्षांपूर्वी महानगरपालिकेतून निवृत्त झाल्याचे ईडीने मान्य केले आहे. आरोपी अधिकाऱ्याने या घराची खरी किंमत समजेल आणि हा व्यवहार कसा झाला याविषयी कोणतेही कागदपत्र सादर केलेले नाही. दुबईतील घर खरेदी करण्यासाठी पैशांची देवाणघेवाण कशी झाली. यासाठी देण्यात आलेल्या पैशांच्या मिळकतीचा स्त्रोत काय होता. याची ईडी कसून चौकशी करत आहे. ईडीने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याचेही सांगण्यात येत आहे. संबंधित दुबईतील घर सध्या भाड्याने देण्यात आले असून त्यातून वार्षिक १३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. या अधिकाऱ्याने अमेरिकन नागरिक असलेल्या मुलीला ४० लाख पाठवल्याचीही माहिती ईडीला मिळाली आहे. त्यामुळे ईडीने आरोपी अधिकाऱ्याच्या उत्पन्नाचे सर्व स्त्रोत तपासण्यास सुरुवात केली आहे.

पालिकेत आजही घोटाळे सुरू आहेत. पालिका प्रशासनाचे कामावर नियंत्रण नसल्याने असे प्रकार घडत आहेत, असे पालिका विरोधी पक्ष नेत रवी राजा यांनी सांगितले. पालिकेतील डीपी म्हणजेच विकास आराखडा विभाग, रस्ते, पर्जन्य जल वाहिन्या विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. या विभागातील अधिकारी अशा प्रकरणात अडकलेले आहेत, असा आरोप त्यांनी केला. पालिकेत अनेक घोटाळे उघडकीस आले. त्यामधील काही अधिकाऱ्यांची पगारवाढ थांबवण्याची कारवाई करण्यात आली. मात्र, असे न होता जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज असल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे. पालिकेत भ्रष्टाचार आजही सुरू असल्याने बीएमसीचे नाव भ्रष्टाचारी महानगरपालिका असे करावे असा टोला त्यांनी लगावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details