मुंबई - शहरात पावसाळयापूर्वीची नालेसफाई सुरु आहे. नालेसफाईची कामे योग्य प्रकारे होतात की नाही याची पाहणी करण्याऱ्यास जाणाऱ्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनाच आचारसंहिता लागू असल्याचे कारण का दिले जाते, असा प्रश्न विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी स्थायी समितीत उपस्थित केला. यावर हा प्रकार गंभीर असल्याने आचारसंहितेच्या कालावधीत महत्वाची कामे होणे गरजेचे आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी महत्वाच्या कामांना नाही म्हणू नये असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.
आचारसंहिता फक्त विरोधी पक्षालाच का ? रवी राजा यांचा प्रश्न लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहितेमुळे मुंबईमधील विकास कामे रखडली, तसेच नालेसफाई संथ गतीने सुरु आहे. मुंबईत निवडणुका संपल्यावर नालेसफाईची कामे पाहण्यासाठी नगरसेवक जात आहेत. मात्र अधिकारी त्याठिकाणी आचारसंहिता लागू असल्याची कारणे देऊन अनुपस्थित राहत आहेत, असे रवी राजा यांनी स्थायी समितीच्या निदर्शनास आणले.
दोन दिवसापूर्वी नालेसफाईची पाहणी करणार असल्याचे पालिकेच्या पर्जन्य जल वाहिन्या विभागाच्या मुख्य अभियंत्यांना सांगितले. त्यांनी आचारसंहिता लागू असल्याचे कारण देत आपल्या विभागाचे अधिकारी या पाहणी दौऱ्याला पाठवले नाहीत. अधिकारी नालेसफाईच्या पाहणीला येत नसल्याने नालेसफाई होत नसल्याची तक्रार आम्ही कोणाकडे करायची असा प्रश्न रवी राजा यांनी उपस्थित केला.
यावेळी रवी राजा यांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी नाले सफाईची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत पर्जन्य जल वाहिन्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मग भाजपचे मुंबई अध्यक्ष व महापौरांना या अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे कारण का सांगितले नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आचारसंहितेचे कारण देऊन अधिकारी नालेसफाईच्या पाहणीला अनुपस्थित राहणे योग्य नसल्याचे भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी म्हटले. यावर विरोधी पक्ष नेत्यांनी अधिकाऱ्यांना कळविले असेल तर त्यांनी नालेसफाईच्या पाहणीस उपस्थित न राहणे ही गंभीर बाब असून, असे होता काम नये, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले जातील असे स्पष्ट केले.