मुंबई - महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम - २०१६ अन्वये मुंबई विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेवर सुप्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांची अध्यक्ष म्हणून नामनिर्देशन करण्यात आले आहे. कुलपती व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हे नामनिर्देशन केले आहे.
युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा आणि आणि शैक्षणिक औद्योगिक कार्यक्षेत्रातील जागतिक प्रवाहांचा सखोल अनुभव आणि ख्यातनाम उद्योगपती सल्लागार परिषदेचा अध्यक्ष म्हणून नामनिर्देशित करावयाची तरतूद असल्याने कोश्यारी यांनी रतन टाटा यांचे नामनिर्देशन केले आहे. तर संशोधन व विकास विषयक धोरणे व कृती योजना यासंबंधात कार्यवाही करणाऱ्या राष्ट्रीय आणि जागतिक संस्थामधील कार्याचा अनुभव असलेले ख्यातनाम शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर आणि महाराष्ट्र शासनाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. उर्वरित दोन सदस्यांचे नामनिर्देशनही लवकरच करण्यात येणार आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू आणि प्र-कुलगुरू हे पदसिद्ध सदस्य म्हणून सल्लागार समितीचे काम पाहणार आहेत. शिक्षण, संशोधन आणि विकास, प्रशासन यासंबंधीचे अहवाल कृती योजना सादर करून त्याद्वारे कुलगुरूना सल्ला देणे, वित्तीय साधनसंपत्ती व सुशासन निर्माण करणे, जेणेकरुन विद्यापीठ शैक्षणिकदृष्ट्या सशक्त, प्रशासनिकदृष्ट्या कार्यक्षम आणि आर्थिकदृष्ट्या भक्कम व्यवस्था निर्माण करण्यासाठी विद्यापीठाची सल्लागार परिषद काम करणार आहे. त्याचबरोबर विद्यापीठ व्यवस्थेच्या संपूर्ण कामकाजाचे संनियंत्रण करण्यासाठी एक कार्यतंत्र व धोरण निश्चित करणे आणि कार्याचा लेखाजोखा ठेऊन विद्यापीठाची प्रगती आणि त्याच्या कार्यात्मक सक्रियतेचे परिणाम आणि समाजातील त्याची अनन्यता याबाबतची माहिती देणे आणि सुक्ष्म विश्लेषण करुन भाष्य करणे यासाठीही सल्लागार परिषदेचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे उपायात्मक यथार्थदर्शी नियोजनासंबंधी विद्यापीठाला सल्ला देऊन विद्यापीठाच्या वृद्धीकरीता महत्वाचे असे विशेष काम हाती घेण्याचा पूर्ण अधिकार अध्यक्षास असल्यामुळे सल्लागार परिषदेवर अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या नामनिर्देशनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. देशासह विदेशातील परिवर्तीत होणाऱ्या शिक्षण पद्धतीत सर्वानुभवी, परिपक्व अशा महनीय पद्मविभूषण रतन टाटा आणि पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह इतर मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहाय्य लाभणार आहे.
विद्यापीठाच्या पुढील १० ते २० वर्षाच्या दीर्घ ध्येय-ध्येयधोरण निश्चितीसाठी याचा खूप मोठा फायदा होणार आहे. तसेच विद्यापीठाच्या जागतिक पातळीवरील संशोधन, नवोपक्रम, नवसंकल्पनांवर भर देऊन देश-विदेशातील चांगली गुणवत्ता आकर्षित करण्यावर गरजाधारीत आणि निकडीच्या क्षेत्रात नविन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी, जागतिक पातळीवर सहकार्य आणि या सर्वांसाठी आवश्यक भौतिक सुविधा तयार करण्यासाठी या सर्व महनीय व्यक्तिंचे बहुमोल सहकार्य लाभणार आहे. त्यामुळे यांच्या नामनिर्देशामुळे मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून विद्यापीठास त्यांच्या नियुक्तीचा सार्थ अभिमान असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.