महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rashmi Shukla : रश्मी शुक्ला लवकरच महाराष्ट्रात परतणार का? गृहमंत्र्यांनी बाळगले सूचक मौन

फोन टॅपिंग प्रकरणात गोत्यात आल्यानंतर केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर गेलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला लवकरच महाराष्ट्रात परतणार असल्याची चर्चा असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मौन पाळले. तसेच पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त चांगले काम करतात, असे सांगत रश्मी शुक्ला यांचा विषय डावलला.

Rashmi Shukla will soon return to Maharashtra Fadnavis silence on this matte
रश्मी शुक्ला लवकरच महाराष्ट्रात परतणार, या प्रकरणाबाबत फडणवीसांचे मौन

By

Published : Oct 26, 2022, 11:33 AM IST

मुंबई :काही दिवसांपूर्वीच रश्मी शुक्ला यांनी मोहित कंबोज यांच्यासोबत सागर बंगल्यावर जाऊन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे दिवस पालटणार असल्याची चर्चा सुरु झाली. यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS officer Rashmi Shukla) यांच्यावरील फोन टॅपिंगच्या आरोपाबाबत सरकारनेही पुढे खटला चालवण्यास नकार दिला असून खटला चालवण्यास गृह विभागाकडे मागितलेली परवानगीही नाकारली. रश्मी शुक्ला यांना यामुळे दिलासा मिळाला. काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला होता. न्यायालयाने हा क्लोजर रिपोर्ट स्वीकारल्यानंतर संबंधित प्रकरणाचा तपास पूर्णपणे बंद होतो. त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्यावरील सर्व कलंक आता दूर झाले आहेत.



रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलीस आयुक्तपद मिळण्याची शक्यता: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis government), 1988 बॅचच्या रश्मी शुक्ला यांना थेट मुंबई पोलीस आयुक्तपद (Mumbai Police Commissioner) मिळण्याची दाट शक्यता आहे. पोलीस आयुक्तपदी त्या विराजमान झाल्या नाहीत तर प्रभारी पोलीस महासंचालक असलेल्या रजनीश शेठ यांच्या जागी त्यांची नियुक्ती होण्याची अटकळ बांधली जात आहे. यापूर्वी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी किंवा राज्याच्या महासंचालकपदी नियुक्तीचे अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना असायचे. मात्र आता मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोण बसणार हे महापालिकेचे आयुक्त कोण होणार किंवा राज्याचा पोलीस महासंचालक कोण होणार याचा एकहाती निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच घेणार असल्याचे समजते. येत्या आठवड्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या अपेक्षित असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केल्यानंतरच बदल्यांच्या यादीवर अंतिम मोहर उमटवतील असे समजते.



रश्मी शुक्ला या कारणामुळे अडचणीत आल्या होत्या: २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकीय नाट्य आणि मोठी उलथापालथ झाली. शिवसेनेने भाजपला धक्का देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडीची स्थापना केली होती. सर्व राजकीय नाट्य तब्बल ३६ दिवस सुरु होते. या काळात महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी तत्कालीन गुप्तवार्ता विभागाच्या अधिकारी रश्मी शुक्ला यांनी संजय राऊत, नाना पटोले, एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केले होते. ज्या नेत्यांचे फोन टॅप केलेत, त्यांची बनावट नावं सांगण्यात आल्यानंतर रश्मी शुक्ला या अडचणीत आल्या होत्या. हे सगळं देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून रश्मी शुक्लांनी केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. रश्मी शुक्ला यामुळे गोत्यात आल्या होत्या. मात्र, आरोप झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांची तातडीने केंद्रीय प्रतिनियुक्तीवर सीआरपीएफमध्ये बदली करण्यात आली होती.



रश्मी शुक्ला यांना अटक होणार असल्याची चर्चा होती: महाविकास आघाडी सरकारने या फोन टॅपिंग प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी प्रकरण मुंबई सायबर सेलकडे सोपवले होते. या सगळ्या चौकशीला रश्मी शुक्ला यांनी अपेक्षित सहकार्य केले नसल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. चौकशीसाठी देखील मुंबईत यायला त्या तयार नव्हत्या. पत्रव्यवहाराद्वारे मी उत्तरे देईन, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. सायबर पोलिसांचे पथक यावेळी हैदराबादलाही गेले होते. न्यायालयाने देखील या प्रकरणात शुक्ला यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रश्मी शुक्ला यांना अटक होणार असल्याची चर्चा होती. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शुक्ला यांच्यावरील फोन टॅपिंगचे प्रकरण गुंडाळण्यात आले आहे.




खांदापालट होण्याची शक्यता:येत्या सहा महिन्यात मुंबई महापालिकेसह राज्यात 15 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आपल्या मर्जीतील अधिकारी त्या त्या शहराच्या पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्तपदी असावेत, अशी रणनीती भाजपकडून आखली जात आहे. रश्मी शुक्ला यांना मुंबईचे पोलीस आयुक्तपद, राज्याचे पोलीस महासंचालकपद किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालक यापैकी एका पदावर बसवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जोरदार खलबते सुरू आहेत. तसेच साईड पोस्टिंगला असलेले देवेन भारती, ब्रिजेश सिंग, विनय चौबे, आशुतोष डुंबरे यांना ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर पोलीस आयुक्तपदी नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते. येत्या आठवड्यात खांदा पालट होण्याची शक्यता आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. मात्र, मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक चांगले काम (Police Commissioners work is good) करत असल्याचे सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details