मुंबई- एका महिन्यांपूर्वी शहरातील चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. या तरुणीचा काल रात्री औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मात्र, मृत तरुणीचे असे हाल करणारे आरोपी अद्यापही मोकाट आहेत. त्यांना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप, मृत तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी चुनाभट्टी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
१९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. तिचा मृत्यू झाला आहे, मात्र आरोपी अद्याप मोकाट आहे मृत तरुणी ७ जुलै रोजी आपल्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली होती. त्यावेळी या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर ती ८ तारखेपासून आजारी होती. एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तिचा काल औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला.
याप्रकरणी गुन्हा पहिल्यांदा औरंगाबाद येथे नोंदविण्यात आला होता. त्यानंतर तो मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. मात्र, एक महिना उलटल्यानंतर देखील आरोपी अजूनही मोकाट आहेत. पोलिसांनी तपासात प्रगती केली नसल्याने या घटनेमुळे संतप्त झालेल्या चेंबूर, चुनाभट्टी परिसरातील नागरिकांनी आणि मृत तरुणीच्या नातेवाईकांनी आज चुनाभट्टी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला आहे.
आरोपी मोकाट असल्याने मृत तरुणीचे नातेवाईक संतापले
या प्रकरणात आरोपी अजून मोकाट असल्याने मृत तरुणीच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलीस आणि डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी सदरील तरुणी कॅटरिंगच्या व्यवसायात काम करायची, ७ जुलै रोजी अत्याचारामुळे घाबरलेल्या पीडितेने या घटनेची वाच्यता घरी केली नव्हती. यावर तिच्या वडिलांनी तिला गावातील रुग्णालयात दाखल केले होते.
मात्र, प्रकृती खालवल्याने तिला औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या तपासात तिला गुंगीचे औषधा बरोबरच ड्रग्जसुद्धा दिल्याचे अहवालात स्पष्ट झाले होते. त्याचबरोबर तिच्यावर बलात्कार झाल्याचेही निष्पन्न झाले होते. यावर तिच्या वडिलांनी औरंगाबाद येथील पोलीस ठाण्यात येऊन गुन्हा नोंदवला होता. मात्र आरोपींची माहिती देऊन सुद्धा पोलिसांनी आरोपीस पकडले नाही. उलट फिर्यादीलाच त्रास दिल्याचा आरोप, नातेवाईकांनी केला आहे
औरंगाबादच्या बेगमपुरा ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर तपासासाठी हे प्रकरण मुंबई येथे वर्ग करण्यात आले. त्यात तपास कामात चुनाभट्टी पोलिसांनी फिर्यादी यांनाच त्रास दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर आरोपीने त्या मुलीला केलेले कॉल आणि इतर पुरावे पोलिसांना देऊन देखील पोलिसांनी अजूनही आरोपीला अटक केले नाही. सदर गुन्ह्यातील दोषी आरोपींना तत्काळ अटक करा, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.