मुंबई :कालच्या होळी दहनानंतर आज रंगपंचमी साजरी करण्यासाठी सर्वत्र सर्वांची लगबग दिसून येत आहे. करोनाच्या सावटा नंतर पहिल्यांदा मोकळ्या वातावरणात रंगपंचमी साजरी केली जात आहे. विशेष म्हणजे ही रंगपंचमी साजरी करण्यासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये युवकांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या घरापासून दूर शिक्षणासाठी मुंबईत आलेले एमबीएचे विद्यार्थी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये रंगपंचमी साजरी करताना दिसून आले. आजच्या हवामानात झालेल्या बदलामुळे येथील वातावरण ढगाळ, थंडगार व आल्हाददायक झालं होतं. कुठल्याही क्षणी पाऊस पडेल अशी शक्यता निर्माण झाल्याने; हे विद्यार्थी सुद्धा पावसाची आतुरतेने वाट बघत होते.
रंगपंचमीच्या नावाने पाण्याची नासाडी :हवामानात झालेले बदल व मरीन ड्राइवरील एकंदरीत वातावरण याविषयी बोलताना, एमबीएच्या दुसऱ्या वर्षाला असलेले हे विद्यार्थी सांगतात की, 'आम्ही रंगपंचमीचा आनंद लुटण्यासाठी इथे एकत्र आलेलो आहोत. इथले वातावरण फारच सुंदर आहे. आमच्या शरीराला जो रंग लावलेला आहे तो सुद्धा पूर्णतः इको फ्रेंडली असून; आम्ही पावसाची आतुरतेने वाट बघत आहोत. जर पाऊस पडला तर आमचा आनंद अजून द्विगुणित होणार आहे. कारण रंगपंचमीच्या दिवशी पाण्याची भरपूर नासाडी होत असते. त्या कारणाने यंदा पावसाचे वातावरण असल्याने; पाऊस पडला तर पाण्याची फार मोठी बचत होण्यास मदत होईल, असेही हे विद्यार्थी सांगतात.