मुंबई:भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (BJP leader Union Minister Narayan Rane) यांच्या मुंबईतील अधिश बंगल्यातील काही भाग हा अनधिकृत असल्याची नोटीस मुंबई महापालिकेने (Mumbai Municipality) बजावली होती. त्याविरोधात राणे यांनी दावा ठोकत कोणतेही काम अनधिकृत नसल्य़ाचे म्हटले होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर आता राणे यांना स्वतःच हे बांधकाम पाडावे लागत आहे. अन्यथा महापालिकेने या बांधकामवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. राणे यांच्याप्रमाणेच अलिकडे काही राजकिय नेत्यांना अनधिकृत बांधकामाच्या नोटीसा (Encroachment Notice ) बजावण्यात आल्या आहेत. याबाबत जाणून घेऊया
परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई : अनिल परब यांचे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे साई रिसॉर्ट आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या रिसॉर्टसंबंधी आक्षेप घेतलेले होते. पर्यावरणीय नियमांचा भंग केल्याचं त्यांनी म्हटले होते. त्यामुळे हे अनधिकृत असल्याचा दावा त्यांनी केलेला. परंतु अनिल परब यांनी हात झटकत हे रिसॉर्ट आपले नसल्याचे सांगितले होते. संबंधित विभागाने या रिसॉर्टची संपूर्ण चौकशी केल्यानंतर ते अनधिकृत ठरवत चिपळूणच्या बांधकाम विभागाने स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिरात देत रिसॉर्ट पाडण्याचा कालावधी तीन महिने ठेवण्यात आल्याचे जाहीर केले . पाडकामाचे टेंडर बांधकाम विभागाकडून काढण्यात आले असून यामध्ये इमारतीची भिंत, कंपाऊंड वॉल, पोचरस्ता, एनएक्सचे बांधकाम पाडायचे आहे. शिवाय जागेचेही सपाटीकरण करायचे आहे. याच कामाची माहिती या जाहिरातीमधून देण्यात आलेली आहे. कामाची अंदाजित रक्कम ४३ लाख २९ हजार ८ रुपये ठरवण्यात आलेली आहे. त्यामुळे या रिसॉर्टवर लवकरच हातोडा पडणार हे निश्चित झाले आहे.
मिलिंद नार्वेकर यांनीही स्वतःच पाडले बांधकाम :माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांचा दापोली येथे समुद्रकिनारी अनधिकृत बंगला असल्याची तक्रारही सोमय्या यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यातील मुरुडच्या समुद्रकिनारी असलेल्या या बंगल्याचे बांधकाम वादात सापडले होते. अखेर हे बांधकाम नार्वेकर यांनी स्वतः पाडून टाकले
कॉंग्रेसच्या नेत्याच्य़ा घरावर कारवाई :अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहराच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामाला राजकीय वरदहस्त होता. पालिका इमारतीसमोर राहणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या पद्माताई भडांगे यांच्या घराचे अतिक्रमित बांधकाम होते. मुख्याधिकारीपदी नव्याने रुजू झालेले नंदू परळकर यांनी अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम सुरू करीत या नेत्यांच्या घरावर बुल़डोझर चालवला. या नेत्या स्थानिक आमदार यांच्या गोटातील समजल्या जात असून, त्यांचे यजमान गोकुल भडांगे हे सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते आहे.