मुंबई- हजारो कोटी रुपयांचा घोटाळ्यात अडकून आर्थिक डबघाईला आलेल्या येस बँकेचा माजी संस्थापक राणा कपूर यास ईडीकडून (सक्तवसुली संचालनालय) अटक केल्यानंतर आज पुन्हा ईडी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी झालेल्या सुनावणीत ईडीकडून पुन्हा एकदा राणा कपूर हा चौकशीत सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राणा कपूरच्या ईडी कोठडीत 16 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
ईडीच्या वकिलांनी आज न्यायालयात येस बँकेच्या घोटाळ्यात तब्बल 30 हजार कोटींची कर्ज देण्यात आल्याचे सांगितले आहे. या 30 हजार कोटींमध्ये 20 हजार कोटी हे बँकेच्या बुडीत कर्जात (एनपीए) गेले आहे. राणा कपूर व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने असलेल्या 78 कंपन्यांना हे 20 हजार कोटी दिले असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या बरोबरच उर्वरीत 10 हजार कोटी रुपये कुठे आहेत, याचाही तपास ईडीला करायचा असल्याने राणा कपूर यांच्या ईडी कोठडीची मागणी करण्यात आली होती.
ईडीच्या वकिलांच्या मागणीवर राणा कपूर यांच्या वकिलांनी राणा कपूर यांच्या ईडी कोठडीला विरोध करत म्हटले, ज्यावेळी येस बँक राणा कपूर यांनी सोडली होती. तेव्हा बँकेच बुडीत कर्ज (एनपीए) केवळ 1 टक्का होता. या नंतर बँकेच्या पदावरून पायउतार झाल्यानंतर 20 हजार कोटींच्या बुडीत कर्जाशी (एनपीए) राणा कपूर यांचे काहीही संबंध नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. येस बँकेच्या संदर्भात सीबीआय 7 मार्च गुन्हा नोंदवला आहे. मात्र, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या प्रकरणात कोणाला तरी जबाबदार धरले जाणार आहे, असे म्हटल्या होत्या. त्यानंतर 6 मार्च ईडीने छापा टाकला होता. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ईडी न्यायालयाने राणा कपूर यास 16 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.