महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजगृह हल्ला प्रकरणाची सीआयडी चौकशी करा; रामदास आठवलेंची मागणी - Ramdas Athawale demand Cid inquiry

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

Ramdas Athawale
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

By

Published : Jul 8, 2020, 2:04 PM IST

मुंबई-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि त्यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ऐतिहासिक वास्तूवर झालेल्या हल्ल्याच्या निषेध केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. हल्ल्याची सीआयडी द्वारे चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.तसे पत्र त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठविले आहे.

राजगृह हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ निवासस्थान आहे. या निवासस्थानात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य होते.त्यामुळे राजगृह ही पवित्र वास्तू आहे. मुंबईत दादरमधील राजगृह हे ग्रंथांसाठी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेली वास्तू आहे. ही वास्तू ग्रंथांसाठी म्हणून उभारलेली एकमेव वास्तू ठरू शकते.

जगभरातील आंबेडकरी अनुयायांचे राजगृह प्रेरणास्थान ऊर्जास्थान आहे. ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि पवित्र असणा-या राजगृह या वास्तूवर हल्ल्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक आहे. राजगृहाचा अवमान करण्याचा हा पहिलाच निंदनीय प्रकार घडला आहे. या हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा करावी या मागे कुणाचा हात आहे हे शोधण्यासाठी या हल्ल्याची सीआयडीद्वारे सखोल चौकशी करावी अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

दरम्यान,राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ग्रंथ खजीना या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची गय करू नका, अशा शब्दात गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना दिले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृहा'ची मंगळवारी सायंकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि घरांच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. मंगळवारच्या घटनेनंतर देशभर निषेध व्यक्त होत आहे.वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकरी जनतेला राजगृह परिसरात येऊ नये आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details