मुंबई - शिवसेनेचे नेते संजय राऊत राज्यात युती तोडण्यासाठी अधिक वक्तव्य करीत आहेत. त्यांनी असे न करता युती जोडण्यासाठी अधिक प्रयत्न करावे, असा सल्ला रिपाइं नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संजय राऊत यांना दिला आहे. तसेच आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होण्याचे शिवसेनेचे ध्येय साध्य होणार नसल्याचे देखील आठवले म्हणाले.
संजय राऊत यांनी युती तोडण्यापेक्षा जोडण्यावर भर द्यावा राज्यात सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या आहेत. त्यामुळे राज्यपाल महोदयांनी त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित करावे, या मागणीसाठी आठवले यांच्यासह इतर नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानुसार दोन दिवसात राज्यपाल निर्णय घेऊन भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण देतील, असा विश्वासही आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपसोबत शिवसेनेने जायला पाहिजे. भाजपने आधी 13 मंत्री देण्याचे सांगितले होते. आता 16 मंत्रिपद शिवसेनेला देण्यात येत आहेत. त्यामुळे भाजपची दिलेली ऑफर स्वीकारून सेनेने सत्तेत यावे, असे सेनेला आवाहन करीत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. 1995 ला शिवसेनेच्या जागा जास्त होत्या. त्यावेळी जागा जास्त होत्या म्हणून त्यांचा मुख्यमंत्री झाला होता. आता भाजपच्या अधिक जागा आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पद त्यांना मिळावे, असे आठवले म्हणाले.
मी एक चांगला कवी आहे. त्यामुळे कवितेमधून युतीतील वाद मिटवावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितले असल्याचे आठवले म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी एक कवितादेखील त्यांनी गायली.
भेटीदरम्यान आपण राज्यातील दुष्काळ आणि इतर परिस्थितीवर राज्यपालांना माहिती दिली असल्याचे आठवले यांनी सांगितले. राज्यात ओल्या दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी राज्यपालांना केली असल्याचे आठवले म्हणाले.