मुंबई Ramakant Acharekar News : माजी क्रिकेटपटू तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांच्यासारखे क्रिकेटपटू घडवणारे क्रिकेट प्रशिक्षक म्हणून रमाकांत आचरेकर यांना ओळखलं जाते. आता शिवाजी पार्कवर रमाकांत आचरेकर यांच्या आठवणी जपण्यासंदर्भात मंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. ज्या मैदानावर रमाकांत आचरेकरांनी अनेक खेळाडू घडवले, त्या मैदानावर त्यांच्या आठवणी जपल्या गेल्या पाहिजेत, अशी इच्छा मनसे नेते राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्या अनुषंगानं मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांची भेट घेतली. याप्रसंगी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारीही त्यांच्यासोबत होते.
क्रिकेटपटू मुलांना कायमस्वरूपी प्रेरणा :भारतरत्न, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे गुरु प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या आठवणी शिवाजी पार्क मैदानावर जपल्या जाव्यात, अशी इच्छा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्या अनुषंगानं मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, "सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक क्रिकेट खेळाडू घडवणारे रमाकांत आचरेकर यांची छोटीशी आठवण शिवाजी पार्क मैदानावर राहिली पाहिजे, याबाबत राज ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली. राज ठाकरे यांनी या संदर्भात अतिशय सुंदर संकल्पना मांडली आहे. ही संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी याबाबत बैठक घेईन आणि लवकरच त्याला मान्यता देईन. अशा संकल्पनेतून क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना कायमस्वरुपी प्रेरणा भेटत राहील. या संकल्पनेबाबत राज ठाकरे अधिक माहिती देतील" असंही दीपक केसरकर यावेळी म्हणाले.