मुंबई - उन्नाव येथील प्रकरणाचे सत्य लवकरच बाहेर येईल, असा विश्वास उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी व्यक्त केला. बलात्कारपीडित तरुणीच्या वाहनाला रविवारी अपघात झाला. यामध्ये ट्रकने कारला दिलेल्या धडकेत तिच्या कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तरूणीसह वकील गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
याबाबत बोलताना राम नाईक म्हणाले की, जे आरोप झाले आहेत, त्याची पूर्णतः चौकशी सीबीआयने करावी, असे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. यामध्ये जे दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल, असे वक्तव्य नाईक यांनी केले आहे. मुंबईतील भाजप प्रदेशाध्यक्ष कार्यलयात नाईक बोलत होते.
या घटनेमुळे उत्तरप्रदेशच्या कायदा व सुव्यवस्थेत बदल झाले आहेत, असे मत मांडणे योग्य नाही. 5 वर्षांपूर्वी असलेला उत्तरप्रदेश बदलला आहे. कायदा सुधारला आहे. संघटित गुन्हे कमी झाले आहेत, वैयक्तिक गुन्हे कमी करण्याचाही प्रयत्न सुरू आहे, असेही नाईक यांनी सांगितले.