मुंबई -मुंबई महानगरपालिकेने नालेसफाईची कामे पूर्ण झाली असल्याचा दावा केला होता. या दाव्याची पोलखोल भाजपा आमदार राम कदम यांनी केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओत पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचे दिसत आहे.
आज घाटकोपर सज्जनगड परिसरात पाऊस पडला. या पावसाच्या पाण्याने नाले भरून रस्त्यावर वाहत होते. यात काही नागरिकांच्या गाड्या वाहून गेल्या, तसेच काहींच्या घरात पाणी घुसले. या परिस्थितीचा व्हीडिओ राम कदम यांनी पोस्ट केला आहे. महत्वाची बाब म्हणजे, राम कदम यांनी हा व्हीडिओ शेअर करताना मुंबई महापालिका, संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टॅग केले आहे.
महापालिकेचा नालेसफाईचा दावा खोटा आहे. आता संजय राऊत म्हणतील की, आम्ही राजकारण करत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी पाहा हा व्हीडिओ, असे सांगत भाजपा आमदार राम कदम यांनी नालेसफाईची पोलखोल केली आहे.