राम कदम यांच्या ट्विटवर मुनगंटीवारांचे मत मुंबई Ram Kadam Demand :आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ११ वा स्मृतिदिन आहे. आजच्या दिवशी शिवाजी पार्कवर असलेल्या बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल झालेत. (Ram Kadam Tweet on Matoshree) अभिवादनासाठी काल रात्रीपासूनच शिवाजी पार्कवर रांगा लागल्या आहेत. तसंच अनेक राजकीय नेत्यांनीसुद्धा बाळासाहेबांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिवादन केलंय. अशात भाजपा आमदार राम कदमांनी आजच्या दिवसाचं निमित्त साधत मातोश्री बंगला जनतेसाठी खुला करण्याची मागणी केली आहे. ते म्हणतात की, बाळासाहेब ज्या मातोश्री बंगल्यामध्ये अनेक वर्ष राहिले, तो बंगला आज बाळासाहेबांचं जिवंत स्मारक म्हणून जनतेसाठी खुला करावा. राम कदमांनी ट्विटर पोस्टद्वारे ही मागणी केली आहे.
उद्धव ठाकरे सध्या मातोश्री 2 वर :राम कदम पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे सध्या मातोश्री 2 वर राहायला गेले आहेत. जुन्या मातोश्री बंगल्यात बाळासाहेब अनेक वर्ष राहिले. अनेक धाडसी निर्णय त्यांनी या बंगल्यात घेतले. तसंच दिवस-रात्र बाळासाहेबांचा या स्थळी वावर होता. म्हणून हेच खरं जिवंत स्मारक असून ते जनतेसाठी का खुलं नाही? असा प्रश्नही राम कदमांनी उपस्थित केला आहे.
देशभरातल्या जनतेसाठी प्रेरक :राम कदम पुढे म्हणाले की, मातोश्री ही वास्तू खऱ्या अर्थानं देशभरातल्या जनतेसाठी प्रेरक आहे. बाळासाहेबांनी वापरलेल्या वस्तूपासून त्यांचं ऑफिस, त्यांची राहण्याची खोली यासह सर्वच काही अद्भूत, प्रेरक आहे. त्यामुळे ही वास्तू बाळासाहेबांचं खरं जिवंत स्मारक म्हणून जनतेसाठी कुठलीही सबब न देता उद्धवजी कधी खुली करणार? तसंच स्वतःला राहण्यासाठी मातोश्री 2 झाला असल्यानं आता ही भावना प्रत्येक बाळासाहेबांना मानणाऱ्यांची आहे.
मागणीला काही अर्थ नाही :राम कदम यांनी केलेल्या मागणीवर बोलताना भाजपा नेते, मंत्री, सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे की, राम कदम यांनी केलेल्या मागणीला काही अर्थ नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये अशी गोष्ट होऊ शकत नाही. म्हणून या मागणीकडे दुर्लक्ष केलेलं बरं. असं सांगून एका अर्थी सुधीर मुनगंटीवार यांनी राम कदम यांनी केलेल्या मागणीला केराची टोपली दाखवली..
हेही वाचा:
- शिवतीर्थावर शिंदे ठाकरे गटात राडा; मस्ती तर उतरवणारच, अंबादास दानवेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
- उद्धव ठाकरेंचं शिवसेनाप्रमुखांना ११ व्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन, पहा व्हिडिओ
- अंबडमध्ये ओबीसी आरक्षण बचाव सभेचं आयोजन, वाचा सविस्तर