मुंबई - पॉलिटिकल कीडा या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट झालेल्या व्हिडिओचा भाजपशी कोणताही संबंध नसल्याचे वक्तव्य भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी केले. तो भाजपचा अधिकृत व्हीडिओ नाही. तो कुठेही प्रचारात वापरलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी कुणाची तुलना करण्याचे भाजप कधीही समर्थन करणार नसल्याचेही कदम म्हणाले.
'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकाच्या गोंधळानंतर आता पुन्हा दुसऱ्या एका व्हिडिओवरुन वादंग निर्माण झाले आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तान्हाजी चित्रपटातील गीताला अनुसरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवरायांच्या तर गृहमंत्री अमित शाह यांना तान्हाजीच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. त्यानंतर भाजपवर सर्वच क्षेत्रातून टीका होताना दिसतेय. मात्र, हा व्हिडिओ ज्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला त्याच्याशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचे राम कदम यांनी म्हटले आहे.