मुंबई- देशात नागरिकत्व संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिक रजिस्टर विरोधात ठिकठिकाणी नागरिकांकडून विरोध केला जात आहे. सुधारित नागरिकत्व कायदा सर्वधर्मसमभाव जपनारा नसून तो समजात तेढ निर्माण करणारा आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून होत आहे. तर दुसरीकडे या गदारोळात राज्यातील काही ठिकाणी उपरोक्त कायद्यांना पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे.
गोंदिया- नागरिकत्व संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिक रजिस्टरवरून देशभरात वातावरण पेटल्याचे पहायला मिळत आहे. गोंदियातही या कायद्यांविरोधात मुस्लिम समाजाने रैली काढत निषेध दर्शवला होता. मात्र, काल जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांनी नागरिकत्व संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिक रजिस्टर या बिलांच्या समर्थनात रॅली काढली. शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील हनुमान मंदिरापासून सुरू झालेली ही भव्य रैली संपूर्ण शहरभर फिरली. उपरोक्त बिल देशाला फायदेशीर असल्याचे या रॅलीच्या माध्यमातून सांगण्यात आले. शहरातील आंबेडकर चौक येथे रैलीचे समापन करण्यात आले.
बुलडाणा- नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील राष्ट्रीय एकता मंच खामगावच्या वतीने काल शहरातून विराट एकता मोर्चा काढण्यात आला. सर्वप्रथम स्थानिक शिवाजी नगर भागातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर सामुहिक राष्ट्रगीत होऊन मोर्चाला सुरूवात झाली. भारत माता की जय, हम सब एक है, अशा घोषणा देत हा मोर्चा भुसावळ चौक, सरकी लाईन, टॉवर चौक मार्गे निघून एसडीओ कार्यालयासमोर पोहचला. येथे काही मान्यवरांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत नागरिकांना माहिती देत या मोर्चामागची भूमिका विषद केली. त्यानंतर तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर करून मोर्चाची सांगता करण्यात आली.