मुंबई- भारताला राजीव गांधी यांनी तंत्र वैज्ञानिक दृष्टी दिली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महाशक्ती बनवून भारताला स्वाभिमान दिला. पुढच्या पन्नास वर्षाचा अर्थव्यवस्थेचा पाया राजीव गांधी यांनी त्यावेळी रचला होता त्यामुळेच आपण आज इथपर्यंत पोहोचू शकलो, असे प्रतिपादन प्रा. विवेक सावंत यांनी केले. माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून राजीव गांधी यांना अभिवादन करण्यासाठी ऑनलाईन अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अभिवादन सभेला माहिती व दूरसंचार तज्ञ विवेक सावंत, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन जोशी उपस्थित होते.प्रा. भाऊसाहेब आजबे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
राजीव गांधी जेव्हा संगणकाबाबत बोलत होते तेव्हा अनेकजण त्यांच्यावर टीका करत होते. मात्र, संगणक क्रांती आणण्याचा त्यांनी ध्यास त्यांनी घेतला होता. राजीव गांधीमुळे सर्वसामान्य घरात संगणक पोहोचला. राजीव गांधी यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे ८ टक्के म्हणजेच १३ लक्ष कोटींचा माहिती तंत्रज्ञान उद्योग उभा राहिला, असे विवेक सावंत यांनी सांगितले. यातून ५० लाख लोकांना थेट रोजगार मिळतो आहे. माहिती प्रधान सभ्यता, ज्ञानप्रधान सभ्यता, बुद्धीमत्ता प्रधान सभ्यता या तीन क्रांतीची पायाभरणी राजीव गांधी यांनी केली. राजीव गांधींच्या कामाची फळे आज भारत देश चाखतो आहे. राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळे भारताचा वेगाने विकास झाला आणि लोकांचे जीवनमान उंचावले, असे सावंत म्हणाले.