पुणे- सध्या राजगुरुनगर शहराला भीमा नदीवरील केदारेश्वर बंधाऱ्यातून पाण्याचा पुरवठा केला जात आहे. सद्य स्थितीत पाण्याचा साठा मुबलक आहे. मात्र, चासकमान धरणाच्या पातळीत घट होत चालली आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये पाण्याची तीव्र टंचाई येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा दुरुपयोग करू नये, असे आवाहन राजगुरुनगर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी केले आहे.
दुष्काळ डोक्यावर, पाणी जपून वापरा; राजगुरुनगर नगरपरिषदेचे आवाहन - नगरपरिषद
पुढील काळामध्ये पाण्याची तीव्र टंचाई येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा दुरुपयोग करू नये, असे आवाहन राजगुरुनगर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी केले आहे.
गेल्या ८ दिवसापूर्वी चासकमान धरणातून २५० क्यूसेसने पाणी भिमा नदीपात्रात सोडण्यात आले होते. त्यामुळे भीमा नदी पात्रालगत असणाऱ्या गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. मात्र, या पाण्याचा दुरुपयोग होणार नाही, याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घेण्याची गरज आहे. कारण चासकमान धरणातील पाणीसाठा हा दिवसेंदिवस कमी होत चालला असून पुढील काळातील उन्हाळी परिस्थिती पाहता मोठी पाणी टंचाईची निर्माण होण्याची शक्यता आहे.
राजगुरुनगर शहराला सध्या लोकसंख्येनुसार ४० लाख लिटर पाणी दररोज लागते. शहरात ३० लाख लिटर पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पातून तर १० लाख लिटर पाणी थेट पुरवठा केला जाते. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा आणि शहरात लागणारे पाणी याची तुलना केली असता, पुढील काळात पाणी टंचाईची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने पाणी बचतीचा संकल्प करून पाण्याचा दुरुपयोग टाळावा. असे आवाहन राजगुरुनगर नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.