मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 'राजगृह' या वास्तूत अज्ञातांनी तोडफोड केली आहे. त्यामुळे राज्यभरात संतापाची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यामिनी जाधव यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. तसेच त्यांनी 'राजगृह' या वास्तूला चोवीस तास पोलीस बंदोबस्त देण्याचे आदेश त्वरित निर्गमित करावेत, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे.
आमदार यामिनी जाधव यांनी 'राजगृहाला' भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दादर येथे 'राजगृह' ही वास्तू आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ पुस्तकांसाठी म्हणून ही वास्तू उभी केली. हजारो पुस्तकांचा खजिना या वास्तूत आहे. बाबासाहेबांच्या अफाट बुद्धिमत्तेचे, व्यासंगाचे आणि अभ्यासाचे हे प्रतीक आहे. या वास्तूत तोडफोड झाल्याचे वृत्त पसरताच राज्यभरात संतापाची लाट उसळली. सर्वच स्तरातून या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करण्यात येऊ लागली.
जाधव यांनीही तातडीने 'राजगृहावर' धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. घडल्या प्रकाराबाबत त्यांनी तीव्र संताप व्यक्त करून गुन्हेगारांना पकडण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर उपस्थित होते.
राजगृहाला भेट दिल्यानंतर आमदार जाधव यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन या प्रकारची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. कोरोनाच्या परिस्थितीत राजगृह सारख्या महाराष्ट्राच्या मानबिंदूची नासधूस करण्याची कृती हा मोठ्या कटाचा भाग असल्याची शंका आमदार जाधव यांनी गृहमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे.
२४ तास पोलीस बंदोबस्त द्या - आमदार जाधव