मुंबई - राज्यात सहा जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत. ते पुन्हा ऑरेंज झोनमध्ये जाणार नाहीत आणि ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांचा रेड झोनकडे प्रवास होणार नाही, यासाठी कंटेनमेंट झोनमधील नियमांचे काटेकोरपणे पालन आवश्यक आहे. मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईनवर भर देण्यासाठी प्रसंगी आक्रमक पावले उचलावी लागतील, असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. आरोग्यमंत्र्यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
महत्वाचे मुद्दे
• केंद्राचे पथक राज्याच्या दौऱ्यावर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत या पथकाची बैठक झाली. त्यांनी मुंबईमध्ये दाट लोकवस्तीतील पॉझीटिव्ह रुग्णांपासून निकट सहवासितांना होणारा संसर्ग टाळण्यासाठी संस्थात्मक क्वारंटाईन करणे आवश्यक असल्याच्या मुद्यावर भर दिला. त्याप्रमाणे मुंबई महापलिकेला सूचना देण्यात आल्या असून, आता अधिक आक्रमकपणे संस्थात्मक क्वारंटाईनसाठी कार्यवाही करावी लागेल. त्यासाठी मैदाने, हॉल घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
• मुंबईत रुग्णवाढीचा गणितीशास्त्रानुसार जो अंदाज मांडला जात आहे. त्याकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत नाही. मात्र रुग्णसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढत नाही.
• कंटेंनमेंट झोनमधील नागरिकांनी नियमांचे आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. या भागातील नागरिकांनी अधिक जागरूक राहून संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
• मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स, बीकेसी, गोरेगाव येथे रुग्णालय उभारण्याचे काम सुरू असून त्याद्वारे सुमारे २००० नवीन खाटा उपलब्ध होणार आहेत.
• राज्यात सध्या ६४ प्रयोगशाळा असून त्यामाध्यमातून दिवसाला सुमारे ९ ते १० हजार चाचण्या होत आहेत.