मुंबई- काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे आज पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. सातव हे गेल्या २० दिवसांपासून कोरोनाने संक्रमित होते. त्यानंतर त्यांनी कोरोनावर मातही केली होती. मात्र, त्यानंतर सायटोमेगॅलो या विषाणूची त्यांना बाधा झाली होती. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
शनिवारी राजीव यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. अखेर रविवारी पहाटे सातव यांची प्राणज्योत मालवली. राजीव सातव हे काँग्रेस नेते राहूल गांधी यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून ओळखले जात होते. आमदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा राजकीय प्रवास त्यांनी अत्यंत कमी वयात केला. राजीव सातव हे २०१४ मध्ये हिंगोली मतदारसंघातून लोकसभेचे खासदार झाले होते. सध्या ते राज्य सभेचे खासदार होते. याच सोबत राजीव सातव हे अखिल भारती काँग्रेस कमिटीचे सचिव आणि गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून ते पक्षाचे काम पाहात होते.
राजीव सातव यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा-
राजीव शंकरराव सातव यांचा जन्म २१ सप्टेंबर १९७४ ला झाला. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. तसेच घरातूनच राजकारणाचा वारसा लाभलेले राजीव सातव हे २०१४ मध्ये पहिल्यांदा हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून लोकसभेत गेले. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांचा पराभव केला होता. सध्या ते गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून कार्य पाहात होते. तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक आहेत.