मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली असली तरी भाजपविरोधी प्रचार करणार असल्याचे त्यांनी जाहीर सभेत म्हटले होते. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुका प्रचाराच्या रणधुमाळीत राज्यातील विविध ठिकाणी ते सभा घेऊन भाजपविरोधात उभे असलेल्या उर्मिला मातोंडकर, संजय दीना पाटील, प्रिया दत्त या उमेदवारांचे स्टार प्रचारक म्हणून सभा घेणार आहेत, अशी माहिती मनसेतील सुत्रांनी दिली आहे.
राज ठाकरे होणार 'या' उमेदवारांचे स्टार प्रचारक - bjp
भाजपविरोधात उभे असलेल्या उर्मिला मातोंडकर, संजय दीना पाटील, प्रिया दत्त या उमेदवारांचे स्टार प्रचारक म्हणून राज ठाकरे सभा घेणार आहेत, अशी माहिती मनसेतील सुत्रांनी दिली आहे.

काँग्रेस आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघात राज ठाकरे यांच्या सभा घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. साधारण ६ जागांवर राज यांच्या सभा होतील. यामध्ये बारामती, मावळ, नाशिक, नांदेड, सातारा, सोलापूर, उत्तर मुंबई, उत्तर पूर्व आणि उत्तर मध्य मुंबई आदी लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीका करत भाजपच्या विरोधात काम करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. उद्या ६ तारखेला गुढी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील सभेत मनसेचा राजकीय कार्यक्रम जाहिर करण्यात येणार आहे. शिवाजी पार्कवरील सभेत राज ठाकरे कुठे आणि किती सभा घेतील याबाबत खुलासा करणार आहेत.