मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) आपल्या कार्यकर्त्यांना 'महाराष्ट्रात जी काही सध्या परिस्थिती आहे. त्याकडे एक संधी म्हणून बघा' असं वेळोवेळी आवाहन करताना दिसत आहेत. पक्ष मजबूत करण्यासाठी आता स्वतः राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेच्या सर्व गटाध्यक्षांचा मेळावा (MNS group presidents ) राज ठाकरे घेणार आहेत. रविवारी मुंबईतील गोरेगावमध्ये हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मेळाव्यानंतर राज ठाकरे लगेचच कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. मेळाव्यानंतर 28 तारखेला राज ठाकरे कोकण दौऱ्यावर निघतील. सहा दिवस ते कोकणात मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी करणार आहेत.
राज ठाकरे काय बोलणार?रविवारी होणाऱ्या गटाध्यक्षांचा मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे राज्यातील सत्ताबदल, राज्यपालांची वादग्रस्त विधानं, राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेलं वक्तव्य, हिंदुत्व या विषयावर नेमकं काय बोलतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून सध्या या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून मनसेचे पदाधिकारी मुंबईत येणार आहेत. या मेळाव्यात अतिउत्साही कार्यकर्त्यांचे राज ठाकरे कान टोचणार का? हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.