मुंबई - राज्यात कोरोना काळामध्ये सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात वीजबिले आकारण्यात आली आहेत. या वाढीव बिलांच्या विरोधात लोकांमध्ये असंतोष आहे. सर्वच पक्ष याविरोधात आंदोलन करताना दिसत आहेत. मनसेने देखील अनेक ठिकाणी तीव्र आंदोलन करत कार्यालये फोडली आहेत. याच पार्श्वभूमीवर आज अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीचे सीईओ शर्मा यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. वीजबिलांबाबत जनतेचा उद्रेक होण्याअगोदर मागण्या मान्य कराव्यात, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
राज ठाकरे आणि अदानी कंपनीच्या सीईओमध्ये वाढीव वीजबिलासंदर्भात चर्चा झाली. कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, वाईट परिस्थितीत लोक जगत आहेत, उत्पन्नाचे साधन नाही. या परिस्थितीत त्यांना ज्या प्रकारची बिले आलेली आहेत ती खूपच जास्त आहेत, असे राज ठाकरे यांनी सांगितले. लोकांमध्ये वाढीव बिलांमुळे कंपन्या बद्दल प्रचंड राग आहे. भविष्यामध्ये या कंपन्यांनी सरकारशी बोलून अथवा कोणत्याही पद्धतीने बील कमी करत दिलासा दिला नाही, तर या जनतेचा कधीही उद्रेक होऊ शकतो. यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाईल ती कोणाच्याच नियंत्रणामध्ये नसेल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.