मुंबई -जास्त नाटकं कराल तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसी विरोधात मोर्चे काढणाऱ्यांना दिला. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात राज यांनी मुंबईत आज मोर्चा काढला. यावेळी आझाद मैदान येथे आयोजीत सभेला संबोधीत करताना ते बोलत होते. तसेच पाकिस्तान आणि बांगलादेशमुधून आलेल्या घुसखोरांना हाकलचं पाहिजे, त्याबाबत कोणतीही तडजोड नको असेही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, हेच ते आझाद मैदान जिथे रझा अकादमीविरोधात मोर्चा काढला होता. बांगलादेशातून जवळपास २ कोटी लोक आलेत. आम्ही हिंदु मात्र बेसावध आहोत. कारण आम्ही दंगल झाली की हिंदु असतो. तसे ते जागृत आहेत तसे आपण असायला हवे. देशात एक जागा आहे, जिथे मौलवी येतात. त्याबद्दल गृहमंत्र्यांना सांगणार आहे. बॉम्बस्फोट झाला, की आम्ही मेणबत्त्या घेऊन मोर्चा काढायचा. एवढेच आपण करतो.
हेही वाचा - प्रभू रामचंद्राचे नाव घायचे अन् आदर्श रावणाचा ठेवायचा, बच्चू कडूंचा लोणीकरांना टोला
हेही वाचा - लहानपणापासून कमळ बघायचे संस्कार नाहीत
बाहेरच्या देशातल्यांनी भारतात राहायला भारत धर्मशाळा आहे का, असा सवाल त्यांनी केला. ज्यांच्याकडे पुरावे नाहीत त्यांनी चालते व्हावे, असे ते म्हणाले. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना बाहेर काढण्याची मागणी त्यांनी केली. पाकिस्तानवरही त्यांनी टीका केली. पाकिस्तान दहशतवादाचा अड्डा असल्याची टीका त्यांनी केली. मुंबईत बॉम्बस्फोट करणारा दहशतवादी दाऊद पाकिस्तानचा होता. जिथे भुसभुशीत जमीन आहे, तिथेच घुशी होतात. ही बिले बुजवली पाहिजेत, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातल्या पोलिसांचे हात मोकळे करा
महाराष्ट्रातले पोलीस हे कार्यक्षम आहेत. ४८ तासांसाठी त्यांचे हात मोकळे करा असे वक्तव्य राज ठाकरेंनी केले. महाराष्ट्र पोलीस राज्यातील क्राईम रेट शून्यावर आणू शकतील. मात्र, त्यांच्यावर दबाव असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले. जिकडे भुसभुशीत जमीन असते तिकडेच घुशी होतात. खडकाळ जमिनीवर घुशी होत नसल्याचे ते म्हणाले.
मीरा भाईंदरमध्ये नायजेरियन लोक राहत आहेत. ते लोक ड्रग्ज विकतात. महिलांची छेड काढतात. त्यांच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही. त्यामुळे अशा बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांना हाकलून देण्याची मागणी त्यांनी केली