मुंबई- उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील घटनांवरून देशभरात संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या घटनेला 'संतापजनक' म्हटले आहे. ट्विटरवर त्यांनी एक पोस्ट शेअर करून तेथील घटनांचा निषेध केला आहे.
उत्तर प्रदेश सरकार आणि तेथील पोलीस प्रशासन नेमके काय लपवायचा प्रयत्न करत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पीडित कुटुंबाला भेटायला जाणाऱ्यांना का अडवले जातंय? त्यांना धक्काबुक्की का केली जातेय? नक्की कशाची भीती या सरकारला वाटत आहे? असे प्रश्न राज ठाकरेंनी विचारले आहेत. महाराष्ट्रात एखादी घटना घडली की, अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत. सर्व माध्यमं उत्तर प्रदेश सरकारवर आज का तुटून पडत नाहीयेत? त्यांना का जाब विचारला जात नाहीये?