मुंबई- अभिनेते ऋषी कपूर ह्यांच्याशी माझा कौटुंबिक स्नेह होता, आणि अर्थात त्यांच्या अभिनयाचा आणि स्पष्टवक्तेपणाचा मी चाहता होतो. सामाजिक, राजकीय आणि व्यवसायाशी संबंधित घडामोडींबाबत ते अतिशय मोकळेपणाने आणि समर्पक शब्दांत व्यक्त होत होते. त्यांचा स्वभाव त्यांच्या ‘ट्विट्स्’मधून दिसायचा. जे मनात तेच ओठावर आणि तेच ‘ट्विटर’वर असा त्यांचा खाक्या होता. त्यांच्या एखाद्या ‘ट्वीट’वर कितीही वादंग माजलं तरी ते मागे हटायचे नाहीत, तसंच एखाद्या विषयावर भूमिका घ्यायला घाबरायचे नाहीत. त्यांच्या जाण्याने एक ‘मोकळंढाकळं ट्विट’ बंद झालं, या शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
यश-अपयशाच्या चौकटी मोडून जे स्वतःला आवडेल, योग्य वाटेल तसं वागणारे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चित्रपट माध्यमावर कमालीचं प्रेम असणारे दोन नट एका मागोमाग हे जग सोडून गेले ह्यासारखी दुःखाची बाब नाही. हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला वहिला 'चॉकलेट बॉय' म्हणजे ऋषी कपूर. 1973 साली बॉबी चित्रपटातून ऋषी कपूर ह्यांनी पदार्पण केलं. तो काळ बंडखोरीचा काळ होता. अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन, मर्दानी देखणा विनोद खन्ना, रसिकांना घायाळ करण्याची अदाकारी असलेला राजेश खन्ना, दमदार संवादफेकीचं कौशल्य लाभलेला शत्रुघ्न सिन्हा, बलदंड धर्मेन्द्रजी आणि चतुरस्र संजीव कुमार ह्यांचा तो काळ होता. ह्या झंझावातात ऋषी कपूर ह्यांनी पदार्पण केलं. स्वप्नाळू पण बंडखोर तरुण-तरुणींचा ते नायक म्हणून त्यांनी स्वत:चं स्थान निर्माण केलं आणि टिकवलं.