राज ठाकरे यांची पत्रकार परिषद मुंबई : Raj Thackeray on Toll Plaza :टोलच्या मुद्द्यासाठी ९ वर्षानंतर सह्याद्रीवर गेलो, असा राज ठाकरे यांनी सांगितलं. ठाण्यातील 5 एन्ट्रीच्या ठिकाणी टोल वाढवण्यात आला. त्यानंतर टोलनाक्याचा विषय आल्याचं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं. मंत्री दादा भुसे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती व मागण्यांबाबत राज ठाकरेंनी माध्यमांना माहिती दिली. मंत्री दादा भुसे यांनी मागण्यांबाबत शब्द दिल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.
सरकारने एक महिन्याचा अवधी मागितला :राज्यातील टोल प्रश्नावर मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे राज्यातील जुने टोल नाके बंद करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मंत्री दादा भुसे यांनीही पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी राज्यात स्थापन झालेले जुने टोलनाके बंद करण्याची मागणीही केली. पत्रकार परिषदेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने वाढीव टोल महिनाभरात रद्द करण्याचे आश्वासन दिले असून, त्यासाठी सरकारने एक महिन्याचा अवधी मागितला आहे.
मनसेतर्फे कॅमेरे बसवण्यात येणार :राज ठाकरे म्हणाले की, आम्ही आमचे स्वतःचे कॅमेरे देखील बसवू. जेणेकरून टोलनाक्यांवर जाणाऱ्या वाहनांच्या संख्येची माहिती मिळू शकेल. सोबातच सर्व टोल नाक्यांवर एक डिजिटल स्क्रीन लावली जाईल. त्यावर एकूण खर्च दिला जाईल. रोज किती कमाई झाली हे देखील दिलं जाईल. त्यानुसार आता किती टोल वसूल झाला आणि किती शिल्लक आहे याची माहिती समोर येणार आहे. त्याचबरोबर जुना टोल बंद करण्याची मनसेची मागणी राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. पीडब्ल्यूडीचे २९ आणि एमएसआरडीसीचे १५ जुने टोल नाके बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत विचार करून निर्णय घेणार असल्याचे राज्य सरकारनं म्हटले आहे. येत्या 15 दिवसांत मुंबईतील सर्व प्रवेश स्थळांवर सरकार आणि मनसेतर्फे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
काँग्रेसचा आरोप : राज्यातील टोल प्रश्नावर मनसेने आंदोलन छेडल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर या प्रश्नी दादा भुसे यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन पत्रकार परिषद घेतली आणि काही निर्णय जाहीर केले. अशा पद्धतीचं समांतर सरकार कोणी चालवत असेल तर ते योग्य नाही. या सरकारनं आपली विश्वासार्हता गमावल्यामुळं त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलाय.
काल सह्याद्रीला मुख्यमंत्री आणि दादा भुसे यांच्यासोबत चर्चा झाली. काल ९ वर्षांनी मी टोल मुक्त करण्यासाठी तिथे गेलो होतो. या आधी 2009 ला गेलो होतो. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांच्यासोबत भुजबळ होते. त्यावेळी मी याच विषयासाठी गेलो होतो. तेव्हा हे सगळे करार बँकांसोबात झाले आहेत. हा विषय पुन्हा आता समोर आला. कारण टोलचे दर वाढवण्यात आले आहेत - मनसे अध्यक्ष राज ठाकरे
पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
- एमएसआरडीसीचे 15 टोल नाके बंद करावे, अशी राज ठाकरे यांनी मागणी केली.
- टोलनाके बंद करण्याबाबत एक महिन्याचा वेळ देण्यात आला.
- टोलनाक्याजवळ राहणाऱ्या नागरिकांना पास देण्यात यावा.
- यलो लाईनपुढे रांग गेल्यास टोल फ्री म्हणजे टोल घेण्यात येऊ नये, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
- टोल नाक्यावर खासगी सुरक्षारक्षक ऐवजी पोलीस तैनात करण्यात येणार.
- अवजड वाहनांमुळे छोट्या वाहनांना त्रास होत आहे, याकडं राज ठाकरे यांनी लक्ष वेधले.
- टोल भरून चांगले रस्ते मिळत नसतील व दादागिरीची भाषा असेल तर काय उपयोग आहे? शौचालयाच्या सुविधादेखील नाहीत. एक्स्प्रेसवेची कॅग चौकशी करा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
- राज्याला महसूल मिळणं गरजेचं आहे. टोल माफी हा विषय नाही. मात्र, टोलचे पैसे किती हे कळायला हवे, असंही ठाकरे म्हणाले.
सौजन्यानं वागण्याची सूचना केली जाईल -मंत्री दादा भुसे म्हणाले की, राज ठाकरे यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत. त्यांच्या मागण्यांबाबत एका महिन्यात निर्णय घेण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. काही मागण्यांवर आजपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आनंदनगर किंवा ऐरोली यापैकी एकाच ठिकाणी टोलनाका असावा, अशी राज ठाकरे यांनी मागणी केली. याबाबत 15 दिवसांत निर्णय होणार आहे. नागरिकांशी सौजन्यपणानं वागावे, अशी टोलनाका ऑपरेटर चालविणाऱ्यांना सूचना केली जाईल. जे कर्मचारी टोलनाक्यावर आहेत, त्यांची पार्श्वभूमी तपासली जाईल, असंही मंत्री भुसे यांनी सांगितलं.
हे आहेत राज ठाकरेंच्या मगणीतील महत्त्वाचे मुद्दे -
- प्रत्येक टोल नाक्यावर स्वच्छ स्वाचतगृह, क्रेन सुविधा, ट्रॅफिक पोलिसांची यंत्राणा आणि CCTV कॅमेरे लावण्यात येणार आहेत. ही यंत्रणा मंत्रालयात लावण्यात येणार आहे.
- फ्लायओव्हर आणि भुयारी मार्गांचे स्ट्रक्चरल ऑडिट आयआयटी या संस्थे मार्फत करण्यात यावेत. नवीन टोल दरवाढ रद करण्यासाठी सरकारला आम्ही १ महिना देणार आहोत.
- ४ मिनिटांहुन अधिक काळ एकही गाडी टोल नाक्यावर थांबणार नाही.
- ही सर्व येत्रणा पोलिसांमार्फत राबवली जाईल.
- टोल नाक्यावर जर फास्ट टॅग बिघडला असेल तर फक्त एकदाच टोल भरला जाईल. आनंदनगर टोल नाका किंवा ऐरोली टोल नाका यापैकी एकच टोल भरावा लागेल.
हेही वाचा-
- Raj Thackeray Met CM : टोल प्रकरणी राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, 'शिवतीर्थ'वर होणार निर्णायक बैठक
- BJP VS MNS over Toll issue in Maharashtra : राज्यात टोलच्या झोलवरून भाजपा-मनसेमध्ये जुंपली, नेत्यांची टोलेबाजी तर कार्यकर्त्यांची आंदोलने